सहकारी गृहनिर्माण संस्थेत तयार होणारा ओला कचरा क्षेपणभूमीवर न पाठवता त्या कचऱ्यापासून खतनिर्मिती मुंबईत केली जात आहे. अंधेरी (पूर्व) येथील विजयनगर सहकारी गृहनिर्माण संस्थेचे कार्यकारी मंडळ आणि सर्व सभासदांच्या सहकार्यातून हा शून्य कचरा प्रकल्प सहकारी गृहनिर्माण संस्थेत राबविण्यात येत आहे.
सहकारी गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष अनिल जोशी, कार्यवाह महेश आठल्ये यांच्यासह विनायक अंतरकर, वर्षां बापट, अनघा लोंढे, प्रा. सुकृता पेठे यांची समन्वय समिती आणि सर्व सभासदांचे सहकार्य या उपक्रमाला मिळाले आहे.  
१ जानेवारी २०१५ पासून सोसायटीत हा प्रकल्प सुरू झाला. सोसायटीत एकूण १४ विंग असून ५१५ सदनिका आहेत. मुंबईतील देवांगिनी सहकारी गृहनिर्माण संस्थेत अशा प्रकारचा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यांच्यापासून प्रेरणा घेत हा प्रकल्प सुरू केला. स्त्री मुक्ती संघटनेच्या ज्योती म्हापसेकर, रश्मी जोशी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांची मोलाची मदत या उपक्रमासाठी होत आहे. प्रकल्प सुरू करण्यापूर्वी बैठका व पथनाटय़ सादर करून सोसायटीत याविषयी जनजागृती केली. सोसायटीत जमा होणारा सुका कचरा ‘आकार’ या स्वयंसेवी संघटनेकडून गोळा करून नेला जातो. ओला कचरा सोसायटीमधील सहा ठिकाणी बांधण्यात आलेल्या हौदात गोळा केला जातो. ३ बाय २ आकाराच्या या हौदात आतून टाइल्स लावण्यात आल्या असून हवा खेळती राहण्याचीही व्यवस्था केलेली आहे. वरून जाळी लावून हे हौद बंदिस्त करण्यात आले आहेत. ओला कचरा एकत्र करणे, तो या हौदांत साठवणे, त्यावर आवश्यक ती तांत्रिक व रासायनिक प्रक्रिया करणे आदी सर्व कामे स्त्री मुक्ती संघटनेच्या परिसर भगिनी करतात.प्रकल्पातून दरमहा ४०० ते ५०० किलो खत तयार होते. ‘वसुंधरा खत’ या नावाने आम्ही त्याची सोसायटीतील सभासद, तसेच बाहेरच्या लोकांसाठी विक्रीही करतो. राष्ट्रीय केमिकल्स अ‍ॅण्ड फर्टिलायझर्सकडून आम्ही या खताची तापसणीही करून घेतली आहे.