कारागृहात असलेल्या पतीला सोडविण्याचे कारण दाखवत शिवीगाळ व मारहाणीद्वारे महिलेची ३० लाख रुपयांना लुबाडणूक झाल्याच्या प्रकरणात न्यायालयाच्या निर्देशावरून दोन जणांविरुध्द उपनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महत्वाची बाब म्हणजे, पतीच्या मित्रासह पोलीस अधिकाऱ्याचाही समावेश आहे.
उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत २०१३ मध्ये हा प्रकार घडला होता. या प्रकरणी तक्रारदार सुषमा सिंग यांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते.
न्यायालयाच्या निर्देशानुसार दोन संशयितांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार महिलेच्या पतीविरुध्द पिंपळगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून तो कारागृहात आहे. सुषमा सिंग यांचा पती शिवमिलन सिंग हा कारागृहात असल्याची संधी साधून त्याचा मित्र अनिल अपसुंदे व पिंपळगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक देविदास शेळके पीडित महिलेच्या घरी गेले. आपल्या पतीचे बिझनेस बँकेत रुबी कन्स्ट्रक्शन या नावाने खाते आहे. अपसुंदे व शेळके यांनी आपल्या घरात अनाधिकाराने प्रवेश केला. कारागृहात असलेल्या पतीला बाहेर काढण्यासाठी त्याच्या बँकेतील पैसे हवे असल्याचे संबंधितांनी सांगितले. पतीचे बँकेतील खात्यातील व्यवहार थांबविण्यात आले आहे. ते पुन्हा सुरू करण्यासाठी पतीने स्वाक्षरी केलेल्या दोन धनादेशासह संपूर्ण पुस्तक संबंधितांनी ताब्यात घेतले. यावेळी आपण विरोध करण्याचा प्रयत्न केला असता संशयितांनी बळजबरीने शिवीगाळ व मारहाण करून धनादेश हिसकावून घेतले, असे तक्रारीत म्हटले आहे. धनादेश मिळविल्यानंतर संबंधितांनी उपरोक्त खात्यातून धनादेश क्रमांक २०४९९९९ द्वारे ३० लाख रुपये बँकेतून काढून घेत फसवणूक केली, असे तक्रारदाराने म्हटले आहे. या प्रकरणातील एक संशयित तक्रारदार महिलेच्या पतीचा मित्र आहे. परिचिताने साथीदाराच्या मदतीने ही फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.