संगणकीकरणाद्वारे देशातील सर्व पोलीस ठाणी एकमेकांशी जोडण्याच्या ‘सीसीटीएनएस’ प्रकल्पाचे काम निधीअभावी आणि वरिष्ठांचा अंकुशच नसल्याने अत्यंत संथगतीने सुरू असून तो पूर्ण होणार तरी केव्हा, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
पोलिसांची देशातील सर्व पोलीस ठाणी व इतर कार्यालयातील संगणक ‘क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क अँड सिस्टम’ द्वारे जोडण्याची घोषणा तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी २३ डिसेंबर २००९ रोजी केली होती. त्याच काळात महाराष्ट्र शासनाने राज्यातील पोलीस ठाण्यांचे संगणकीकरण करण्याची योजना हाती घेतली. राज्यात १०५४ पोलीस ठाणी, तसेच इतर शाखा आणि अधिकाऱ्यांना संगणक उपलब्ध झाले. संगणक व सीसीटीएनएस यंत्रणेचे प्राथमिक प्रशिक्षण निवडक कर्मचाऱ्यांना दिले गेले. जून २०११ पर्यंत देशात ही यंत्रणा कार्यान्वित होणार होती. मात्र, अद्यापही हा महत्वाकांक्षी प्रकल्प पूर्णत्वाला गेलेला नाही.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दुर्गम भागात संगणक पोहोचले असले तरी वायरिंगचीच कामे सुरू आहेत. राज्यात बहुतांश ठिकाणी संगणकाची जोडणी पूर्ण होऊन त्यावर माहिती भरण्याचे कामही पूर्ण होत आले असतानाच तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने पुन्हा आधीपासून माहिती भरण्याचे काम ठिकठिकाणी सुरूच आहे. राज्यात सर्वत्र हीच स्थिती आहे. माहिती भरण्यासाठी आणि यंत्रणा स्थापन करण्यासाठी नियुक्त मनुष्यबळ तोकडे असल्याने काम अत्यंत संथगतीने सुरू आहे. तांत्रिक उभारणीची जबाबदारी एका खाजगी कंपनीला देण्यात आली आहे. त्यामुळे सर्व व्यवस्था त्या कंपनीवरच अवलंबून आहे. पोलिसांचे आयुक्तालय, तसेच इतर शाखांमध्ये नियुक्त नोडल अधिकाऱ्यांना अतिव्यस्ततेमुळे वेळ काढणेच कठीण होत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
यंत्रणा कार्यान्वित होण्यास निधीची चणचण हा सर्वात मोठा अडथळा आहे. तरतुदीपेक्षा निधी कमी उपलब्ध झाला. नव्याने निधीची चणचण आहे. राजकीय पुढाऱ्यांना निवडणुकांमुळे लक्षच देण्यास वेळ नाही. त्यामुळे हा प्रकल्प रेंगाळत असल्याचे सूत्रांनी सांगितले. ‘सीसीटीएनएस’मुळे देशातील पोलीस यंत्रणा स्वयंचलित, कार्यक्षम, पारदर्शी व जनताभिमुख होईल. तपास त्वरेने आणि सुयोग्य होण्यासाठी, कायदा-सुव्यवस्था व वाहतूक समस्या उद्भवल्यास गुन्हेविषयक व गुन्हेगारांची माहिती देशात कुठेही व तातडीने उपलब्ध होईल.
देशात कुठूनही नागरिकांना तक्रार करता येईल, तपासाची स्थिती कळेल आणि त्याचा पाठपुरावा करता येईल. त्यामुळेच या प्रकल्पास वेळ लावून चालणार नाही. त्यासाठी मनुषबळ वाढवावे लागणार आहे.

सॉफ्टवेअरची तांत्रिक अडचण
मध्यंतरी दोन वेळा सॉफ्टवेअरची तांत्रिक अडचण निर्माण झाली होती. त्यानंतर पुन्हा माहिती भरण्याचे काम सुरू आहे. काम संथ सुरू आहे, असे म्हणता येणार नाही. गुन्हेविषयक सांख्यिकी बरीच मोठी असल्याने वेळ लागत आहे. बहुतांश ठिकाणी हीच परिस्थिती आहे.
सुनील कोल्हे, प्र.अतिरिक्त पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा (सीसीटीएनएस नोडल अधिकारी नागपूर  शहर)