आपल्या महाविद्यालयाच्या आजूबाजूला १०० मीटर परिसरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाची विक्री होत नाही ना याची हमी आता महाविद्यालयांना थेट सरकारलाच द्यावी लागणार आहे. मुंबई विद्यापीठाने याबाबतच्या सूचना देणारे परिपत्रक महाविद्यालयांना पाठविले असून त्याबाबतचा अहवाल तात्काळ सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

महत्त्वाचे म्हणजे अशा आरोग्याला हानिकारक पदार्थाची विक्री करणाऱ्या पानपट्टीवाल्यांबरोबरच महाविद्यालयाच्या परिसरात उच्छाद मांडणाऱ्या फेरीवाले, विक्रेते यांना अटकाव करायचा म्हटला तरी ते महाविद्यालयांना शक्य होत नाही आहे. कारण, महाविद्यालय कायदा हातात घेऊन फेरीवाल्यांना हाकलू शकत नाही. त्याकरिता महानगरपालिका प्रशासन आणि पोलीस यांचे सहकार्य आवश्यक असते. अनेकदा या महाविद्यालयांच्या विनंतीला प्रतिसाद देतातच असे नाही. त्यामुळे, पानपट्टीवाल्यांना अटकाव कसा करायचा, असा प्रश्न महाविद्यालयांना पडला आहे.
याबाबत वांद्रे येथील नॅशनल महाविद्यालयाचे उदाहरण पुरेसे बोलके आहे. लिंक रोडसारख्या खरेदीकरिता अत्यंत प्रसिद्ध असलेल्या रस्त्याला लागून हे महाविद्यालय आहे. त्यामुळे या महाविद्यालयाला फेरीवाल्यांचा त्रास नेहमीच भेडसावतो. याबाबत महाविद्यालयाने पालिका व पोलिसांकडे वारंवार पाठपुरावा केला. मात्र, तरीही महाविद्यालयाला पडलेले फेरीवाल्यांचा विळखा कायम आहे.
या संबंधात आपण पोलीस आयुक्तांना पत्र लिहिल्यानंतर त्यांच्या सूचनेवरून खार पोलीस ठाण्यातील वरिष्ठ उपनिरीक्षक आमच्या महाविद्यालयात आले. माझ्यासमवेत त्यांनी महाविद्यालयाच्या परिसराची पाहणी केली. त्या वेळी फेरीवाले आपले सामान कुठे दडवून ठेवतात, याची माहितीही मी त्यांना दिली. त्यानंतर येथील फेरीवाल्यांवर कारवाईही झाली, परंतु काही दिवसांनी फेरीवाले पुन्हा या परिसरात आपले सामान घेऊन बसू लागले. या सगळ्याला आम्ही किती पुरे पडणार? आम्ही कायदा हातात घेऊ शकत नाहीत. जे काही करायचे आहे ते पालिका आणि पोलिसांना करायचे आहे. त्यामुळे, या प्रश्नावर विद्यापीठाने महाविद्यालय, पोलीस आणि पालिका यांची एकत्रित बैठक घ्यावी, अशी सूचना महाविद्यालयाचे प्राचार्य दिनेश पंजवानी यांनी केली.
आता मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या एका निकालाचा आधार घेऊन तंबाखू नियंत्रण कायद्यातील कलम ६ नुसार सर्व शैक्षणिक संस्थांच्या १०० मीटर परिसरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ विकण्यास बंदी आहे. या नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायद्यानुसार २९९ रुपये दंड आकारण्याची तरतूदही कायद्यात आहे. संस्थांनी याबाबत संस्थांच्या प्रवेशद्वारावर फलक लावणे बंधनकारक आहे. या निकालाचा हवाला देत विद्यापीठाने आपल्या सर्व महाविद्यालयांना या नियमांची अंमलबजावणी करण्याच्या सूचना केल्या आहेत. इतकेच नव्हे तर यावर केलेल्या कार्यवाहीचा अहवाल विद्यापीठाकडे व सरकारकडे सादर करण्याचे आदेश दिले आहेत. पण या नियमाच्या अंमलबजावणीत महाविद्यालयाबरोबरच पालिका आणि पोलिसांची भूमिकाही महत्त्वाची ठरणार आहे. त्यांच्याकडून मिळणाऱ्या सहकार्याशिवाय या नियमाची अंमलबजावणी करता येणे शक्य नाही, अशी महाविद्यालयांची भूमिका आहे.

विद्यापीठाचे काय?
आपल्या १०० मीटर परिसरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाची विक्री होऊ देऊ नका, अशी सूचना महाविद्यालयांना करणाऱ्या मुंबई विद्यापीठाच्याच परिसरात या कायद्याचे उल्लंघन होते आहे. कारण, विद्यापीठाच्या फोर्ट आणि कलिना संकुलात सर्रास या प्रकारच्या पदार्थाची विक्री होत असते.