शिसा या घातक पदार्थाच्या विषबाधेमुळे शून्य ते चौदा वर्षे वयोगटातील बालकांना विविध आजार होत असल्याचे संशोधनातून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे शिशावर कायमची बंदी घालावी, अशी मागणी नागपुरातील लता मेडिकल रिसर्च फाऊंडेशनने केली आहे. यावर आताच बंदी घातली नाही, तर येणाऱ्या पिढीला त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी भीतीही व्यक्त करण्यात येत आहे.
शिसा हा घातक पदार्थ भिंतीला लावणारे पेंट, घरगुती रंग, रंगकांडय़ा, रंगीत पेन्सिल, होळीचे रंग, चिनीमातीच्या बरण्यांमध्ये वापरला जातो. याबरोबरच मातीतही शिसे असते. त्यामुळे या वस्तूंच्या सानिध्यात आल्यास शिशाची विषबाधा होते. ती झाली की, या मुलांमध्ये डोकेदुखी, चिडचिडेपणा, पोटदुखी, थकवा येणे, मळमळ होणे, रक्तक्षय, लकवा, कमी ऐकायला येणे, एकाग्रता नसणे ही लक्षणे आढळून येतात. एवढेच नव्हे, तर ज्या मुलांच्या रक्तात शिशाच्या विषाचे प्रमाण अधिक असते. अशा मुलांचा बुध्यांक कमी असतो. तसेच काही मुले गुन्हेगारीकडेही वळत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
लता मेडिकल रिसर्च फाऊंडेशनने शहरातील शंभर मुलांवर हे संशोधन केले. त्यातील ६० टक्के मुलांमध्ये ही लक्षणे आढळून आले. या मुलांच्या रक्त नमुन्यात १० मायक्रोग्रॅमपेक्षा अधिक शिसे असल्याचे आढळून आल्याचे फाऊंडेशनच्या उपाध्यक्ष डॉ. अर्चना पटेल यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.
अमेरिका, युरोप आणि आशिया खंडातील काही देशांनी शिशावर कायमची बंदी घातली आहे. त्याचप्रमाणे पेट्रोलमध्येही शिसे वापरण्यास बंदी घातली आहे. भारतातही तशी बंदी घातली असली तरी अन्य वस्तूत ते आजही सर्रास वापरली जाते. फाऊंडेशनने केलेल्या विनंतीवरून भारतातील पेंट निर्माण करणाऱ्या तीन कंपन्यांनी पेंटमध्ये शिसे वापरण्यास बंदी घातली. हे फाऊंडेशनला मिळालेले पहिले यश असल्याचेही डॉ. पटेल म्हणाल्या. कारखाने असलेल्या भागातील मुलांमध्ये शिशाचे प्रमाण अधिक आढळून येते. कारण, धुराच्या माध्यमातून शिसे वातावरणात पसरतो. दूषित वातावरणातून अन्नामध्ये आणि अन्नातून पोटात शिसे जात असते. त्यामुळे गर्भातील बाळालाही त्याची विषबाधा होत असल्याचे एका संशोधनातून स्पष्ट झाल्याचेही त्या म्हणाल्या.
शिशामुळे मुलांचे मेंदू, मूत्रपिंड, फुफ्फुसावर परिणाम होतो. विदेशात दरवर्षी मुलांच्या रक्ताची चाचणी घेतली जाते, परंतु भारतात शिशामुळे विषबाधा होत असल्याची माहितीच नाही. बालरोग तज्ज्ञांनाही ही माहिती नसल्याबद्दल डॉ. पटेल यांनी खंत व्यक्त केली. आमच्या संघटनेतर्फे शाळा, महाविद्यालयात जाऊन जनजागृती केली जात आहे. शासन प्रदूषणाच्या बाबतीत काहीच लक्ष देत नाही. शिसे वापरणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा कायदा करावा व त्याची अंमलबजावणी करावी, असे झाले तरच येणारी पिढी आरोग्य मुक्त राहील. शासनाने प्रत्येक शासकीय रुग्णालयात शिसे चाचणी केंद्र उघडले पाहिजे. नागपुरात फक्त एकाच ठिकाणी हे चाचणी केंद्र आहे. २२ ते २४ सप्टेंबर २०१४ दरम्यान नवी दिल्ली येथे ‘ग्लोबल अलायन्स ऑफ एलिमिनेशन ऑफ लेड’ या संघटनेची एक बैठक आयोजित करण्यात आली आहे. या संघटनेच्या सल्लागार म्हणून डॉ. अर्चना पटेल त्यात सहभागी होणार आहेत. या बैठकीत भारत आणि अन्य देशातील आरोग्य विभागाचे सचिव उपस्थित राहणार आहेत. त्यात शिसापासून होणाऱ्या विषबाधेवर सविस्तर चर्चा केली जाणार आहे. यानंतर शिसावर कायमची बंदी घालावी, या मागणीचे एक निवेदन केंद्र सरकारला देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.  

प्रतिबंध कसा करावा
शिसेरहित घरगुती रंगाचा वापर करावा. मुलांच्या खेळण्यात शिसे वापरू नये. शिसे असलेल्या वस्तूंपासून मुलांना दूर ठेवावे. खेळल्यानंतर आणि जेवणाआधी हात धुवावे. मुलांची दरवर्षी रक्त चाचणी करावी. आरोग्य खात्याने व सामाजिक संघटनांनी शिशापासून होणाऱ्या विषाबाधेबाबत जनजागृती करावी. आरोग्य खात्याने मुलांच्या रक्ताची तपासणी करावी. बालरोग तज्ज्ञ व शाळेतील शिक्षकांनी शिशाच्या दुष्परिणामांची माहिती द्यावी.
-लता मेडिकल रिसर्च फाऊंडेशन