घरकामातून मिळालेला मोकळा वेळ काही चांगल्या कामासाठी वापरावा, या साध्या उद्देशानं कलात्मक दृष्टीकोन आणि नवीन करून बघण्याची वृत्ती असलेल्या सुजाता संजय अग्रवाल यांनी राधाकृष्णाच्या मूर्तीसाठी १०-१५ पोशाख तयार केले. मारवाडय़ांमध्ये घरोघरी राधाकृष्ण, लड्डू गोपाल यांच्या मूर्ती देवघरात असतातच. त्यामुळे नातेवाईक किंवा परिचितांना पोशाख भेट देता येतील, असा विचार सुजाता भाभींनी केलेला होता. त्याच वेळेस ओरिसात साडय़ांचा व्यवसाय करणारे त्यांचे नातेवाईक घरी आल्यावर भाभींनी तयार केलेले पोशाख पाहून मी दुकानात ठेवून बघतो म्हणून ते सर्व पोशाख स्वत: बरोबर घेऊन गेले आणि नवल म्हणजे, अगदी एका तासात सर्व पोशाख विकले गेले. इतकंच नाही, तर त्यांनी आणखी पोशाखांची ऑर्डर दिली. ‘देवांच्या पोशाखांना इतकी मागणी येऊ शकते आणि याचा व्यवसायही करता येतो, याची मला कल्पनाच नव्हती’ सुजाता भाभी सहजपणे सांगून जातात. तिथूनच एका प्रयोगाचं व्यवसायात रूपांतर झालं.
आपण मराठी लोक स्वत: नटू-सजू, पण घरातल्या देवांना नटवणं, वेगवेगळे पोशाख, त्याला शोभणारे दागिने, देवघरातली साजसज्जा, असा प्रकारच नसतो, पण मारवाडी देवांच्या नटवण्यालाही महत्व देतात आणि खूप हौसेनं नटवतात. भाभींकडे राधाकृष्ण, लड्डू गोपाल (म्हणजे बाळकृष्ण) यांच्या पोशाखांच्या जास्त ऑडर्स असतात, परंतु इतरही देवांसाठी पोशाख बनवून मिळतात. देवाच्या मूर्तीला किती प्रकारांनी सजविलं जाऊ शकत, याची कल्पना भाभींच्या वर्कशॉप (हा त्यांचाच शब्द) मध्ये गेल्यावर येते. भाभींचं मूळ काम पोशाख बनविण्याचं, पण लोकांच्या गरजेप्रमाणं त्यांनी देवांचे दागिने, हार व इतर सजावटीचं सामान, पण उपलब्ध करून दिले. मी हा व्यवसाय म्हणून न बघता देवाची सेवा म्हणून करते. यामुळे देवाला सजविण्याच्या उद्देशानं इथं येणारा कुणीही रिकाम्या हातानं माझ्या बजेटमधलं नाही म्हणून परत जाऊ नये, यासाठी अगदी कुणालाही परवडेल, अशा देवाच्या पोशाखापासून तर तुम्ही सांगाल तितक्या महाग पोशाखापर्यंत मी सर्व ठेवते, असं भाभी समाधानानं म्हणतात. देवांचं वेगवेगळ्या कपडय़ांमधलं अतिशय कलात्मकतेनं सुंदर रंगसंगती साधून बनविलेले पोशाख त्याला शोभणारे दागिने, देवांसाठी आसन, देवांच्या मागं लावण्याचा पडदा-पिछवाई, पिछवाईची सजावट, असा सर्व संच भाभी खूप मनापासून बनवून देतात.
देवासाठी उपलब्ध असणारे दागिने बघितले की, थक्क व्हायला होतं. देव-देवतांसाठी मुकूट, हार, बांगडय़ा, कंबरपट्टे, नथनी, बिंदी, बोरला, पायल, किलंगी-पाग (पगडी, फेटा) कुंडल, बासली एक ना अनेक. भाभी उत्साहानं ‘ये इसके साथ खूब जायेगा, देखो कितना सुंदर लग रहा हैठ’ असं म्हणत संपूर्ण सजावटच समजावून सांगतात. प्रत्येक सणासाठी देवांचा वेगवेगळा श्रृंगार व पोशाख भाभी तयार करून देतात. श्रीनाथजींचे भक्त वर्षांतील आठ ऋतू व दिवसाचे आठ प्रहर याप्रमाणे देवांचा श्रंगार व पोशाख बदलतात. त्यासाठी सर्व ऋतूंना अनुकूल कपडय़ांचं म्हणजे थंडीत लोकरीचा, गर्मीत मलमलचा, असे सुंदर पोशाख भाभी बनवून देतात. जर लेसेस, जरदोजी, मोती, कुंदन, आरसे इ. नी सजविलेले हे देवांचे डिझायनर पोशाख बघतच रहावे, असे असतात. श्रावण महिन्यात राधाकृष्णासाठी सजविलेले झुले, कृष्णजन्मासाठी पाळणा, त्यावेळेसचे राधाकृष्ण, लड्डूगोपाल यांचे पोशाख तर विशेषच असतात. राखीच्या सणात बहिणीकडून भावा घरच्या देवांचा पोशाख, लग्नाच्या वेळी नवरीच्या घरून, नवरदेवाच्या देवांना होणार कपडय़ाचा अहेर, तसंच लग्नात नवरीच्या मामाकडून नवरदेवाच्या देवांकरिता येणारे पोशाखही तसेच भारी असतात. असेच मारवाडी लग्नात सगा-सगी (व्याही व विहिण) यांना भेट दिले जाणारे राधाकृष्ण व त्याचे पोशाख किंवा राधाकृष्णाचे फोटो यांनाही भाभी समयोजित पोशाख व दागिने बनवून देतात.
कृष्णजन्म साजरा करण्यासाठी उपस्थित लोकांना देण्यात येणारी भेट-बधाई (रिटर्न गिफ्ट म्हणा ना) बजेटप्रमाणे भाभी करून देतात. केवळ घरगुती देवदेवताच भाभींकडच्या पोशाखांनी सजतात, असं नाही तर मंदिरातल्या मूर्तीसाठीही भाभी पोशाख-दागिने-पिछवाई तयार करून देतात. नवसपूर्ती किंवा सेवा म्हणून मंदिरात देवाला पोशाख अर्पण करणाऱ्यांनाही त्यांच्या गरजेप्रमाणे भाभी सुंदर पोशाख बनवून देतात. नुसते पोशाखच नाही, तर देवांसाठी लागणाऱ्या अनेक वस्तू, अत्तरं, रोली, देवासाठी पलंग, पाट, खेळाचे प्रकार (चौसर, पतंग-मांजा आणि अनेक खेळ गोल्फ स्टिक व बॉल सुद्धा) देवासाठी नाईट ड्रेस अशा अनेक ‘अ‍ॅक्सेसरीज’ त्यांनी उपलब्ध करून दिल्या आहेत.
आपल्या व्यवसायातून देवसेवा करणाऱ्या भाभी त्यांच्या माहितीपत्रकावर बेटी बचाओ चळवळ सुरू होण्यापूर्वी पासूनच ‘बेटी’ बद्दलच्या प्रबोधनात्मक कविता छापतात. या कविता वेळोवेळी बदलत असतात. आता अनमोल बेटियाँ ही सुंदर कविता त्यांच्या माहिती पत्रकावर छापलेली आहे. घरकामातून फावल्या वेळात सुरू केलेल्या या छंदानं व्यवसायाचं स्वरूप घेतलं असलं तरी आजही भाभी घर सांभाळूनच हा व्याप सांभाळत आहेत व वाढवत आहेत. २००४ मध्ये एका मदतनीसापासून सुरू झालेला हा उपक्रम आज चांगलाच स्थिरावला आहे. ‘जब भी जी परेशान होता है, मै यहाँ वर्कशॉप आके कुछ बनाती हूँ, सुंदर चीज बन जाती है तो दु:ख भूल जाती हूँ। क्रिएटिव्ह काम है, भगवान की सेवा की है लेकिन बिझिनेस की सोच (अ‍ॅट्टियूट) पहले भी नही थी, अभी भी नही’ असं  प्रामाणिकपणे सुजाता भाभी सांगतात. देवांसाठीही कुणी डिझायनर पोशाख शिवत असेल, असा विचार तुम्ही तरी कधी केला होता?    

जाणिजे यज्ञकर्म
आपण मराठी लोक स्वत: नटू-सजू, पण घरातल्या देवांना नटवणं, वेगवेगळे पोशाख, त्याला शोभणारे दागिने, देवघरातली साजसज्जा, असा प्रकारच नसतो, पण मारवाडी देवांच्या नटवण्यालाही महत्व देतात आणि खूप हौसेनं नटवतात.