आरोग्य, शिक्षण, पोषण, जनजागरण व जनसंवाद मोहिमेचा प्रारंभ झरी येथे मंत्री प्रकाश सोळंके व आरोग्य राज्यमंत्री फौजिया खान यांच्या उपस्थितीत झाला. परभणीचा मानव विकास निर्देशांक उंचावण्यासाठी फौजिया खान यांच्या संकल्पनेतून ही महत्त्वाकांक्षी मोहीम हाती घेण्यात आली. खासदार गणेशराव दुधगावकर, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मीना बुधवंत, उपाध्यक्ष समशेर वरपूडकर, जिल्हाधिकारी शालिग्राम वानखेडे, मुख्य कार्यकारी अधिकारी नृसिंह मित्रगोत्री, माजी राज्यमंत्री सुरेश वरपूडकर आदी उपस्थित होते. पालकमंत्री सोळंके म्हणाले की, हे अभियान महत्त्वाचे असून या माध्यमातून विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य घडविण्यास मदत होईल. फौजिया खान यांनी या मोहिमेविषयी गावागावात उत्सुकता असून अधिकारी संवेदनशील झाले असल्याचे सांगितले. या अभियानामुळे शाळा, अंगणवाडी, आरोग्य केंद्रे यांची वस्तुनिष्ठ तपासणी होऊन कार्यक्षमतेत वाढ होण्यास मदत होणार आहे, असेही त्या म्हणाल्या. आरोग्य योजनांची माहिती देणाऱ्या माहितीपटाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. विविध परीक्षा, स्पर्धामध्ये यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा या वेळी सत्कार करण्यात आला. मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प केलेल्या दहाजणांचे अर्ज फौजिया खान यांच्याकडे सोपविण्यात आले.