शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वाघदर्डी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात वाहून येणारे पाणी चारीव्दारे शेतात नेण्याचे तसेच पांझण नदीपात्रातून मोठय़ा प्रमाणात अवैधरित्या वाळू काढण्याचे प्रकार सुरू झाल्याने शहराला होणाऱ्या पाणीपुरवठय़ावर भविष्यात परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
वाघदर्डी धरणात सध्या ३० टक्के साठा आहे. धरण भरलेले नसताना पाणलोट क्षेत्रातून पाणी चोरीचे प्रकार होऊ लागले आहेत. यासंदर्भात होणाऱ्या तक्रारींची दखल घेऊन पालिकेतर्फे पत्राव्दारे जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी आणि चांदवड तहसीलदार यांच्याकडे या प्रकाराला आळा घालण्याची मागणी करण्यात आली आहे. धरण पाणलोट क्षेत्रात काही शेतकऱ्यांकडून वाहून येणारे पाणी अडविले जात आहे. हे पाणी चारीव्दारे शेतात व विहिरीत नेण्यात येत असल्याचे आढळले आहे. तसेच धरणाजवळील पांझण नदीपात्रात अवैधरित्या वाळू उपसा होत असल्याचे पालिकेच्या निदर्शनास आले आहे. शहराला यापूर्वी तीव्र टंचाईला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे धरणात येणारे पावसाचे पाणी अडवू नये तसेच वाळू उपशामुळे वाघदर्डी धरण व परिसरात खड्डे होऊ नये याकरिता त्वरित प्रतिबंधात्मक कारवाई करावी, अवैध वाळू उपसा थांबवावा, ट्रॅक्टरमधून वाळू चोरून नेणाऱ्यांविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाव्दारे करण्यात आली आहे. पालिकेच्या कामगारांनी वाळू व पाणीचोर यांना अडविण्याचा प्रयत्न केला असता त्यांना धमकी देण्यात आल्याने तेथे तातडीने बंदोबस्त नेमण्याची मागणी नगराध्यक्ष योगेश पाटील, प्रभारी मुख्याधिकारी दिलीप मेनकर यांनी केली आहे.दरम्यान, मनमाड पूरक वाढीव पाणीपुरवठा योजनेतील काही किरकोळ कामे तांत्रिक अडचणींमुळे बाकी असून ही कामे लवकरच पूर्ण होऊन शहराला सात दिवसाआड असलेला पाणीपुरवठा तीन ते चार दिवसाआड करता येणे शक्य होईल अशी माहिती नगराध्यक्ष योगेश पाटील यांनी पत्रकाव्दारे दिली आहे. वाघदर्डी धरण क्षेत्रात मागील तीन ते चार वर्षांत अत्यल्प पाऊस झाल्याने शहराला टंचाईला तोंड द्यावे लागले. अशा परिस्थितीत शहरासाठी वाढीव पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली. योजनेतंर्गत पाटोदा साठवण तलावाची खोली वाढविण्याचे काम, पाटोदा ते कातरणी जलवाहिनी टाकणे, पाटोदा साठवण तलाव व वाघदर्डी येथे नवीन पंपींग स्टेशन, जलशुद्धीकरण केंद्र बांधणे अशी कामे पूर्ण तर, काही अंतिम टप्प्यात आहेत.
एकूणच मनमाडचा पाणी प्रश्न कायम स्वरुपी सुटण्याच्या दृष्टीने मंजूर योजनांमुळे पाटोदा साठवण तलावाची क्षमता पाच दलघफूवरून १८ ते २० दलघफू इतकी झाली आहे. मनमाडसाठी अजूनही पालखेड कालव्यातून सहा आवर्तन मिळणे बाकी आहे. एका आवर्तनाला सरासरी २० दलफुट पाणी घेता येणे शक्य होत असल्याने सहा आवर्तनाचे १२० दलघफू आणि वाघदर्डी दरण, पाटोदा साठवण तलाव या दोन्ही ठिकाणी एकूण ५५-५६ दलघफू साठा शिल्लक असल्याने या वर्षांत सरासरी १७५ दलघफू पाणी शिल्लक असून शहराला वर्षांत सरासरी १३५ दलघफू पाणी पुरवठा अपेक्षित असल्यामुळे शहराला सात दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय मनमाड नगरपारिषदेने घेतला आहे.