गरीब मुलांसाठीच्या शाळा, सामाजिक संस्था, रुग्णालये येथील फर्निचरची दुरुस्ती करून देशभरातील सुतार २० डिसेंबरला अनोख्या पद्धतीने श्रमदान करणार आहेत. गरीब मुलांकरिता काम करणाऱ्या ८०० वेगवेगळ्या संस्थांमधून हे श्रमदान केले जाणार आहे. १८० शहरांमधील तब्बल ५० हजार मुलांना या उपक्रमाचा अप्रत्यक्षपणे फायदा होणार आहे.
या उपक्रमात सहभागी होणारे सुतार आणि कंत्राटदार हे रोजंदारीवर काम करणारे कामगार आहेत. या उपक्रमात सहभागी होऊन ते आपला एक दिवसाचा रोजगार सामाजिक कामासाठी देणार आहेत. यातले बरेचसे कामगार हे स्वत: आर्थिकदृष्टय़ा दुर्बल आहेत. तरीही ते आपले कौशल्य या उपक्रमाकरिता देऊ करणार आहेत.
गेल्या वर्षीही या उपक्रमाच्या माध्यमातून देशभरातील ३२५ सामाजिक संस्था, शाळा, रुग्णालयांमधील फर्निचरची दुरुस्ती सुतारांनी करून दिली होती. त्यात २२००० कामगार सहभागी झाले होते. यात अंध विद्यार्थ्यांसाठीच्या शाळा, आदिवासी शाळा, अपंग विद्यार्थ्यांच्या शाळा, पालिका शाळा, अनाथाश्रम, सरकारी शाळा आणि रुग्णालये, वृद्धाश्रम आदी संस्थांचा समावेश होता. मुंबई, पुणे, दिल्ली, नागपूर, नाशिक, अहमदाबाद, बडोदा, राजकोट, सुरत, गांधीनगर, अमृतसर, जालंधर, रूरकी, बंगलोर, चेन्नई, कोलकाता, पाटणा, जयपूर आदी शहरांमधील संस्थांचा यात सहभाग होता. फेविकॉल चॅम्पियन्स क्लबच्या वतीने सुमारे महिनाभर हा उपक्रम राबविला जाणार आहे. या क्लबची देशात ३८० केंद्रे आहेत. या केंद्रांशी संबंधित असलेले सुतार आणि कंत्राटदार हे या उपक्रमात सहभागी होतील. फर्निचरच्या दुरुस्तीसाठी लागणारे साहित्य पिडीलाइटतर्फे पुरविले जाणार आहे.
या उपक्रमाच्या माध्यमातून विशिष्ट प्रकारचे साऊंडप्रूफ प्लायवूड वापरून मूकबधिर विद्यार्थ्यांकरिता शाळेत बसण्याची बाके तयार करण्यात आली होती. फर्निचर दुरुस्तीचे कामही एकाही पैशाचा मोबदला न करता केले जाते. सुतारकाम करणाऱ्या कामगारांकरिता आणि त्यांच्या कुटुंबीयांकरिता या क्लबच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जातात.
स्वयंरोजगार, प्रशिक्षण शिबिरे, वैद्यकीय तपासणी, रक्तदान शिबीर, पल्स पोलिओ, नेत्र तपासणी याबरोबरच विविध धार्मिक व सांस्कृतिक स्वरूपाचे कार्यक्रम क्लबच्या माध्यमातून घेतले जातात.