काही वर्षांपासून मराठी चित्रपटांचा दर्जा सुधारत आहे, पण हिंदी चित्रपटांच्या तुलनेत मराठीची प्रसिद्धी होत नाही. एका आठवडय़ात दोन ते तीन चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होत आहेत. स्पर्धेच्या नियमाप्रमाणे मोठा मासा छोटय़ा माशाला खातो. तसेच काहीसे चित्रपटाच्या बाबतीत झाले आहे. मात्र आता मराठीतही कलावंत, दिग्दर्शक, निर्माते सजग झाले असून प्रसिद्धीच्या माध्यमातून अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत कसे पोहोचता येईल यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मराठी चित्रपटांना ‘प्राइम टाइम’ मिळणार असल्याने प्रेक्षकांची संख्या वाढेल तसा त्यांचा दर्जाही वाढेल, अशी अपेक्षा अभिनेता सचिन खेडेकर यांनी व्यक्त केली.
साची एण्टरटेनमेंट निर्मित ‘नागरिक..’ चित्रपटाच्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी चित्रपटाचे दिग्दर्शक जयप्रद देसाई, निर्माते सचिन चव्हाण, अभिनेत्री देविका दप्तरदार, मिलिंद सोमण, विद्रोही गीतकार संभाजी भगत उपस्थित होते. खेडेकर यांनी मराठी चित्रपट सध्या आशयघन आणि वास्तवदर्शी होत असल्याचे नमूद केले. चित्रपटाला मिळणाऱ्या ‘प्राइम टाइम’मुळे चित्रपटाचा दर्जा उंचावण्यास मदत होईल. ‘नागरिक..’ चित्रपटात एक शोध पत्रकार आणि राजकारणी यातील संघर्ष असून समाजकारण, राजकारण यासह विविध विषयांवर तो भाष्य करतो. आपल्या सभोवतालची परिस्थिती बदलत असते त्यानुसार सत्य बदलत राहते. आजच्या समाजाचा आरसा म्हणून या चित्रपटाकडे पाहता येईल. पत्रकारांसमोर कामे करताना अनेक बंधने असतात. त्यांची तारेवरची कसरत कामातून प्रत्यक्षात साकारणे आपल्यासमोर आव्हान होते. शोध पत्रकारितेचे अनेक चेहरे चित्रपटात सापडतील, असे ते म्हणाले. सोमण यांनी आजवर विविध भूमिका साकारल्या. विकास पाटील या राजकारण्याच्या भूमिकेतून प्रथमच मराठी चित्रपटसृष्टीत काम करत असल्याचे सांगितले. वेगळे काही करायला मिळाले याचा आनंद असल्याचे त्यांनी नमूद केले.
भगत यांनी चित्रपटातील काही गीतांवर आक्षेप घेतला जाईल, पण आपला समाजच वादग्रस्त आहे याकडे लक्ष वेधले. एखाद्या कलाकृतीतून समाजाला काही संदेश द्यायचा असेल तर अशा मुद्दय़ांना हात लावलाच पाहिजे. कलावंत म्हणून ती जबाबदारी आपण पेलतो असे त्यांनी सांगितले. देसाई यांनी महेश केळुसकरांच्या कथेवर या चित्रपटाची आखणी करण्यात आल्याचे सांगितले.
टोकदार संवाद हे चित्रपटाचे वैशिष्टय़ असून अनेक दिग्गजांनी आपल्या अभिनयाने चित्रपटात रंग भरले असल्याचे त्यांनी सांगितले. चित्रपटास सवरेत्कृष्ट सामाजिक चित्रपटासह ५ पुरस्कार प्राप्त झाले आहेत. येत्या १२ जून रोज चित्रपट प्रदर्शित होत आहे. ज्येष्ठ अभिनेत्री सुलभा देशपांडे, नीना कुलकर्णी, ज्येष्ठ अभिनेते श्रीराम लागू, दिलीप प्रभाळकर, माधव अभ्यंकर, राजेश शर्मा, राजकुमार तांगडे, नितीन भजन यांच्या भूमिका आहेत. संगीत-रचना संभाजी भगत व टब्बी पारीख, स्वरसाज सुखविंदर सिंग, शंकर महादेवन, शाहीर संभाजी भगत यांनी चढविला आहे.