कपडय़ांपासून ते अ‍ॅक्सेसरीजपर्यंत प्रत्येक गोष्टीतून सर्वापासून वेगळी अशी आपली छाप सोडण्याच्या प्रयत्नामध्ये असलेल्या तरुणाईसाठी त्यांच्या मोबाइलचे कव्हर हेही एक स्टाइल अ‍ॅक्सेसरीच असते. बाजारात उपलब्ध असलेल्या नानारंगी आणि नानाढंगी मोबाइल कव्हर्समध्ये आता खादी कापडाचा शिरकाव झाला आहे. एरवी खादी किंवा हातमागावरच्या कापडांना ‘गावठी’ समजून दूर सारणाऱ्या तरुणाईचे रंगीबेरंगी पट्टय़ांचे डिझाइनचे हे मोबाइल कव्हर्स लक्ष वेधत आहेत.
विविध प्रिंट्सचे मोबाइल कव्हर्स विकणारे फेरीवाले हे सध्या मुंबईच्या प्रत्येक स्टेशनबाहेरील ठरलेले दृश्य असते. दिवसाच्या कोणत्याही प्रहारी या फेरीवाल्यांकडे गर्दी नियमाची असतेच. तरुणांमध्येही अवघ्या १५० रुपयांपासून सुरू होणाऱ्या या मोबाइल कव्हर्सना प्रचंड मागणी आहे. दरवेळी मोबाइलचे नवीन मॉडेल बाजारात आल्यावर ते विकत घेणे हे सर्वानाच शक्य नसते. पण बाजारात येणारे हे नवनवीन कव्हर्स मोबाइलला लावून कॉलेजमध्ये मिरवणे त्यांच्यासाठी सोयीचे असते. अर्थात या मोबाइल कव्हरमुळे मोबाइल पडल्यास त्याला जास्त दुखापत होत नाही, हा त्यामागचा मूळ उद्देश. पण त्यापलीकडे जाऊन हे कव्हर्स दिसायलाही सुंदर असावेत, अशीही त्यांची मागणी असते. या मागणीलाच अनुसरून प्लॅस्टिकच्या विविध कव्हर्सनी बाजारपेठ सजलेली दिसते. प्लॅस्टिकच्या या कव्हर्सवर बहुतेकदा पाश्चात्त्य सुपरहिरो, कार्टून्स, बॉलीवूड चित्रपटांचे प्रिंट्स पाहायला मिळतात. या सर्वापासून थोडा वेगळा प्रयत्न म्हणून बाजारात खादी कापडाचा वापर केलेल्या ‘देसी अवतारा’तील कव्हर्स पाहायला मिळत आहेत. खादी कापडाला काहीसा खरखरीतपणा असतो, त्याचा वापर येथे कव्हरची पकड मजबूत करण्यास केला आहे. अर्थात मोबाइल कव्हरचा मोबाइलच्या संरक्षणासाठी असलेला मूळ उद्देश लक्षात घेऊन आणि कापडाला पकड मिळण्यासाठी कव्हरच्या मागच्या बाजूला प्लॅस्टिकचा वापर केला आहे. अवघ्या १५० ते २०० रुपयांमध्ये हे कव्हर्स फेरीवाल्यांकडे उपलब्ध आहेत. यातील खादीच्या कापडावरील गुलाबी, हिरवा, निळा असे उजळ रंग आणि त्यावरील पट्टय़ापट्टय़ांची किंवा भौमितिक डिझाइन्स तरुणाईचे लक्ष वेधून घेत आहे. काळ्या किंवा गडद रंगांमुळे या कव्हर्सना रस्टिक लुक मिळालेला दिसतो. त्यामुळे या कव्हर्सना अस्सल ‘देसी अवतार’ मिळाला आहे. अर्थात डिझाइनमध्ये कुठेही भडकपणा नाही, तसेच जीन्स-टीर्शटपासून ते कुर्ता-लेगिंगपर्यंत विविध प्रकारच्या कपडय़ांसोबत हे सहज शोभून दिसतात.