तालुक्यातील सर्वात मोठी आणि जुनी शैक्षणिक संस्था खान्देश शिक्षण मंडळाची त्रवार्षिक निवडणूक लवकरच होणार असल्याने पुन्हा एकदा हे मंडळ चर्चेत आले आहे. या शिक्षण मंडळामध्ये झालेल्या ५० लाखाच्या अपहार प्रकरणामुळे चर्चेत आहे.
माजी सचिव, माजी प्राचार्य व संचालक यांच्यावर अपहारप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर सर्वानी न्यायालयातून अटकपूर्व जामीन मिळविला, तर दुसरीकडे सस्थेचे सभासद आणि मानवाधिकार संघटनेचे कार्यकर्ते जयप्रकाश पाटील यांनी संस्थेच्या अध्यक्षांना पत्र पाठवून कार्यकाळ संपला असतानाही निवडणूक का जाहीर करीत नाही, असा जाब विचारला आहे. विद्यमान संचालकांनी कार्यकाळ संपूनही अल्पकाळासाठी नवीन कार्याध्यक्ष व कार्य उपाध्यक्षांची केलेली निवड पाहता अनेकांच्या भुवया उंचावल्या. नवीन कार्याध्यक्षांनी निवडणुका वेळेत न झाल्यास राजीनामा देऊन पदमुक्त होऊ असे सूतोवाच केले. अन्य संचालकांनीही निवडणूक लवकरच घेण्यास सहमती दर्शविली, तर संस्थेच्या विकासकामांचे उद्घाटन होणे बाकी असल्याने निवडणुकांना उशीर होत असल्याचे विद्यमान संचालक तथा माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील यांनी म्हटले आहे.
३० ऑक्टोबर २०१० रोजी संस्थेची मागील निवडणूक झाल्याने १६ ऑक्टोबर २०१३ रोजी विद्यमान संचालकांचा कार्यकाळ संपला होता. कार्यकाळ पूर्ण होण्याच्या दोन महिने आधीच अधिनियमान्वये निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करावा लागतो. मात्र सत्तेत असलेल्या विद्यमान संचालकांकडून निवडणूक लांबणीवर टाकली जात असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत असतानाच नुकत्याच झालेल्या संस्थेच्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत त्रवार्षिक निवडणूक घेण्याविषयीचे पडघम वाजले. संस्थेचे राज्यात चार हजार ५०० सभासद आहेत. सत्तेत असेल्या विद्यमान संचालकांनी एक हजार ८०० सभासदांची वाढ केल्याचा आरोप संचालक विनोद पाटील आणि डॉ. अनिल शिंदे यांनी मागील काळात केला होता. विशेष म्हणजे या बैठकीत संस्थेतील सत्ताधारी व विरोधकांनी एकमेकांच्या घेतलेल्या गळाभेटी आगामी काळातील वेगळ्या राजकारणाची नांदी मानण्यात येत आहे.
साने गुरुजींच्या मार्गदर्शनाने वाढलेली ही संस्था अपहारप्रकरणी झालेल्या मानहानीतून पुन्हा नव्याने कशी उभी राहणार आणि मानहानी कशी भरून निघणार, ही बोच संस्थाप्रेमींना आहे.