गेल्या ४० वर्षांपासून सुरू असलेल्या बसोलीच्या शिबिरांचा आनंद केवळ विदर्भातीलच नव्हे, तर देशभरातील लाखो मुलांनी रंग, रेषा, नाटय़, नृत्य आणि धमाल मस्ती करीत घेतला. आता मात्र हा आनंद पुढील वर्षीपासून मिळणार नाही. बसोलीच्या छैलछैबिल्यांच्या शिबिराचे हे शेवटचे वर्ष आहे. शिबीर बंद करताना त्रास होईल. मात्र, उपाय नसल्याचे मत बसोलीचे संस्थापक आणि ज्येष्ठ चित्रकार चंद्रकांत चन्ने यांनी व्यक्त केले.
गेल्या ४० वर्षां पासून बसोलीच्या माध्यमातून लहान मुलांच्या दुनियेत रमणारे आणि प्रत्येकाला आपलेसे वाटणारे चंद्रकात चन्ने  यांनी लोकसत्ता कार्यालयाला भेट दिली त्यावेळी ते बोलत होते. रंग-रेषांच्या माध्यमातून गेल्या ४० वर्षांपासून लहान मुलांसाठी शिबिरे आयोजित करीत असल्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणची लाखो मुले बसोलीशी जोडली गेली आहेत. हे सारे करताना अनेक अडचणी आल्या तरी त्यातून मार्ग काढला. आतापर्यंत अनेक शिबिरे घेतली मात्र त्यातून आऊटपूट काहीच मिळत नाही. साधारणत एक शिबीर घेण्यासाठी १० ते १५ लाख रुपये खर्च येतो. बसोलीचे शिबीर मुळात व्यावसायिक नाही. त्यामुळे पैसा कमविणे हा उद्देश कधीच नव्हता. विद्यार्थ्यांकडून नाममात्र शुल्क घेऊन १० ते १२ दिवसांचे निवासी शिबिरे आतापर्यंत घेतली. ग्रामीण आणि शहरी भागातील अनेक मुले यात सहभागी झाली. आनंदवन, हेमलकसा, विमलाश्रम या ठिकाणाहून आलेल्या मुलांनी या शिबिरांचा आनंद घेतला, असे ते म्हणाले.
शिबिरासाठी मोठय़ा प्रमाणात पैसा जमवावा लागतो आणि ते देणारे असले तरी त्यांच्याकडे कितीदा पैसे मागायचे, हा मोठा प्रश्न आहे. मुळात मुलांना अशा शिबिरांची आज गरजच नाही. अन्य शिबिरांसारखे बसोलीचे शिबीर संस्कार शिबीर नाही. अनेक पालक संस्कार शिबीर म्हणून मुलांना घेऊन येतात. मी त्यांना  मुलांवर संस्कार करीत नसल्याचे सांगत नसतो, असे सांगून ते म्हणाले, येथे मुलांचा मुक्तसंचार असतो तसाच शिबिरातील ताई-दादांचा धाकही असतो. गेल्या काही वर्षांत मुलांचे प्राधान्यक्रम आणि आवडीनिवडी बदलल्याने त्यांना अशा शिबिरांची खरंच गरज नसल्याचे वाटत आहे. गेल्या ४० वर्षांत शिबिराच्या माध्यमातून खूप लोक जुळले आणि वेगळा मनस्वी आनंदही मिळाला. हीच माझी खरी श्रीमंती आहे. शिबीर बंद केल्यानंतर मला आणि शिबिराशी संबंधित अनेकांना त्याचा त्रास होईल. मात्र, माझ्याकडे पर्यायच नाही. शिबिराला पर्याय काय आहे ते ठरविण्यात येईल. मात्र, तुर्तास तरी त्याबाबत काहीच विचार केलेला नाही. २८ वर्षे पं. बच्छराज व्यास शाळेत शिक्षक होतो. त्या दरम्यान शिबिरे घेतली. मुलांसाठी काम करण्याचा जो आनंद मिळाला आहे तो अवर्णनीय आहे. कुठेही गेलो की, बसोलीचे अनेक जुने शिबिरार्थी भेटल्यावर दोघांनाही जो आनंद होतो ना तो शब्दातीत आहे. मला ४० वर्षांत काय मिळाले, असे कोणी विचारले तर खूप खूप आनंद मिळाल्याचे सांगतो. आजची पिढी खूप लाघवी आहे. ती ज्याच्यावर प्रेम करते त्याला विसरत नाही. गेल्या ४८ वर्षांंपासून शिबिरासाठी खूप खूप वणवण केली. मात्र आता थांबले पाहिजे. त्यामुळे पुढच्या वर्षीपासून शिबीर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी अनेक लोकांनी आणि संस्थांनी मला मदत केली. मात्र एकानेही आजपर्यंत पैशाचे काय झाले, हे विचारले नाही. आणखी काय हवे? लोकांचा विश्वास असला की ते देतात. मात्र, देणाऱ्यांकडे कितीदा हात पसरायचे, याचाही विचार केला पाहिजे ना. संगणकापेक्षा कॅन्व्हासवर चित्र काढण्याचा आनंद वेगळाच. संगणकावर दहा-पंधरा मिनिटात चित्र काढता येते. मात्र, कॅन्व्हासवर रंग, कुंचल्याने चित्र रेखाटण्याचा जो आनंद मिळतो तो काही औरच. पाहून चित्र काढण्याची सवय झाल्यामुळे स्वतच्या मनाने एखादे चित्र काढण्याची मानसिकताच राहिली नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.