– ‘मॅगी’प्रकरणामुळे सेलेब्रिटी धास्तावले!
– उत्पादनांची भलामण अंगाशी..
– थेट तक्रारीसाठी ‘गामा’ पोर्टल

बॉलीवूडच्या मोठय़ा पडद्यावरील ‘स्टार सेलेब्रिटी’चा फायदा आपल्या उत्पादनाला करून घेण्यासाठी विविध उत्पादक कंपन्या सेलेब्रिटीना घसघशीत रक्कम मोजून जाहिरातीत घेतात. दूरचित्रवाहिन्यांवरील अनेक जाहिरातींमध्ये ही मंडळी आपला चेहरा झळकवीत असतात. मात्र ‘मॅगी’ प्रकरणामुळे ही ‘स्टार सेलेब्रिटी’ मंडळी धास्तावली आहेत. जाहिरातीमध्ये एखाद्या उत्पादनाची भलामण करणे त्यांच्या अंगाशी आले आहे.

‘मॅगी’च्या जाहिरातीमध्ये काम करून ‘मॅगी’ची भलामण केल्यामुळे अभिनेत्री माधुरी दीक्षित, प्रीती झिंटा, बॉलीवूडचे बिग बी अर्थात अमिताभ बच्चन हे अडचणीत आले आहेत. ‘मॅगी’मध्ये अपायकारक असे काही घटक असल्याच्या वृत्तामुळे अन्न आणि औषध प्रशासनाने ‘मॅगी’ कंपनीसह या ‘स्टार सेलेब्रिटीं’नाही नोटीस बजावली आहे. काही दिवसांपूर्वी एका जाहिरातीत शार्क माशाला गुद्दे लगावल्याच्या प्रकरणामुळे या जाहिरातीमध्ये काम करणारा अभिनेता रणबीर सिंगही अडचणीत आला आहे. प्राण्यांसाठी काम करणाऱ्या ‘पेटा’ या संस्थेने संबंधित कंपनी आणि रणबीरकडे याबाबत विचारणा केली होती.
‘पेप्सी’ आणि ‘कोक’ या शीतपेयांमध्येही शरीरास अपायकारक असे काही घटक असल्याचे निष्पन्न झाले आहे. तरीही काही क्रिकेटपटू व अभिनेते जाहिरातीत याची तोंडभरून स्तुती करत आहेत. आता पुढचे पाऊल कदाचित ही मंडळी असण्याचीही शक्यता वर्तविण्यात येत आहे. मुळात आपण ज्या जाहिरातीत काम करतो किंवा ज्या उत्पादनाची भलामण करतो, त्याविषयी हे स्टार सेलेब्रिटी काही माहिती करून घेतात का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित करण्यात येत आहे.
गेल्या काही महिन्यांपासून स्वयंसेवी संस्था, या विषयातील अभ्यासक यांच्याकडून ‘मॅगी’ किंवा अन्य शीतपेयांमधील शरीरास घातक असणाऱ्या काही घटकांबाबत जनजागरण करण्यात येत होते. मात्र आत्तापर्यंत ठोस कारवाई केली जात नव्हती. ‘मॅगी’च्या निमित्ताने किमान एक पाऊल पुढे टाकले गेले आहे.
अशा प्रकारच्या दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींच्या विरोधात आता सर्वसामान्य नागरिक व ग्राहकांना थेट तक्रार करता येणार आहे. केंद्र शासनाच्या ग्राहक संरक्षण मंत्रालयाने त्यासाठी एक खास पोर्टल तयार केले आहे. (Grievances Against Misleading Advertisements) अर्थात ‘गामा’असे या पोर्टलचे नाव आहे. ग्राहकांना आपली तक्रार या पोर्टलवर (http://gama.gov.in/) थेट नोंदविता येणार आहे.