चोऱ्या, लूटमार, दिवसाढवळ्या सोनसाखळ्या खेचून पलायन, यासारख्या घटना काही दिवसांपासून शहरात वाढल्या असताना गुन्हेगारांचा छडा लावण्यात पोलीस यंत्रणेला यश येत नसल्याने शहरातील कायदा व सुव्यवस्था ढासळत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. पोलिसांच्या थंडपणामुळे गुन्हेगार निर्ढावले असून सर्वसामान्यांमध्ये भीती पसरली आहे. पोलिसांनी याची गंभीर दखल घेऊन शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणी भाजपतर्फे करण्यात आली आहे. पक्षाचे शहराध्यक्ष नितीन पोफळे यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने या संदर्भात पोलीस उपअधीक्षक महेश सवई यांना निवेदन देण्यात आले.
तीन आठवडय़ात महिलांच्या सोनसाखळ्या ओरबाडण्याच्या डझनभर घटना शहरात घडल्या आहेत. घरफोडी व व्यापाऱ्यांकडील पैशांच्या बॅगा हिसकावून नेण्याच्या घटनादेखील वाढल्या आहेत. गुन्ह्यांसाठी चोरटय़ांकडून वेगवेगळे उपाय अवलंबिले जात आहेत. अलीकडेच कॅम्प भागात पत्ता विचारण्याच्या बहाण्याने दुचाकीवरील दोघांनी एका शिक्षिकेची सोनसाखळी ओरबाडली. पाठोपाठ सटाणा नाका भागातील सेवानिवृत्त महिलेची सोनसाखळी खेचण्यात आली. या प्रकारांमुळे सर्वसामान्य हादरले आहेत. चोरी व सोनसाखळी खेचण्याच्या घटना वाढत असतांना अशा घटनांना आवर घालण्यात पोलिसांना अपयश येत आहे. गुन्हेगारांना पोलिसांचा धाक राहिला नसल्याचे चित्र त्यामुळे निर्माण झाले आहे. ढासळत्या कायदा सुव्यवस्थेसंदर्भात पोलिसांनी कठोर योजना करण्याची मागणी भाजपने निवेदनात केली आहे. शहरातील मोक्याच्या ठिकाणी गस्त वाढवावी, सोयगाव नववसाहत व दाभाडीसाठी स्वतंत्र पोलीस ठाणे निर्माण करावे, कलेक्टर पट्टा, चर्च परीसर, डी.के. कॉर्नर आदी ठिकाणी पोलीस दूरक्षेत्र कंद्राची व्यवस्था करावी, विशेष पोलीस पथकांची संख्या वाढवावी, अशा उपाययोजनाही पक्षातर्फे सूचविण्यात आल्या आहेत.
या शिष्टमंडळात भरत पोफळे, हरिप्रसाद गुप्ता, दिलीप पिंगळे, सुधीर जाधव, उमाकांत कदम आदींचा समावेश होता.