लग्न, लग्नसंस्था, मराठी तरुण-तरुणींचा लग्नसंस्थेविषयीचा गोंधळ, प्रेम-करिअर या विषयांवर गेल्या काही काळात मराठीमध्ये लागोपाठ चित्रपट आले आहेत. त्याचबरोबर मुक्ता बर्वे-स्वप्निल जोशी यांची आधी मोठय़ा व मग छोटय़ा पडद्यावर जुळलेली ‘केमिस्ट्री’ प्रेक्षकांच्या अंगवळणी पडली आहे; परंतु असे असूनही ‘मंगलाष्टक वन्स मोअर’ हा चित्रपट लग्नसंस्था, प्रेमसंबंध यावरचा असूनही ही प्रेमकथा किंचित वेगळी आणि सरस ठरते. लेखक-दिग्दर्शकाने प्रेमविवाह झालेल्या नवपरिणीत, आजच्या पिढीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या तरुणाईची मानसिकता दाखविण्याचा चांगला प्रयत्न केला आहे. दिग्दर्शकाला छायालेखकाची लाभलेली उत्तम साथ यामुळे चित्रपट नेत्रसुखद ठरतो. भाष्य करण्याचे मुद्दाम न ठरविता सहजपणे जाता-जाता संवादांतून भाष्य करण्याचा दिग्दर्शकाचा प्रयत्न यशस्वी ठरला आहे.
आरती आणि सत्यजित दोघे भेटतात, त्यांच्यात प्रेम जुळते, ते लग्न करतात. लग्न केल्यानंतर सत्यजितच्या नवीन फ्लॅटमध्ये आरती राहायला येते, घर सजविते, सत्यजितची काळजी घेते. स्वत: एमबीए असूनही करिअरच्या मागे न धावता गृहिणी बनून राहणे आरती पसंत करते. ती जणू तिची प्रेम करण्याची पद्धत बनली आहे. आरतीला सत्यजितची प्रत्येक बाबतीत काळजी घेणे आवडते. सत्यजित एका रेडिओ चॅनलमध्ये मोठय़ा हुद्दय़ावर आहे. क्लायंटला पटवून निधी आणण्याचे काम करताना त्याची दमछाक होतेय, सतत तणावाखाली राहिल्यानंतर ‘रिलॅक्स’ होण्यासाठी त्याचे दररोज मद्यपान करणे याला आरतीचा अर्थातच विरोध आहे. त्यामुळे तुझी तब्येत बिघडेल, बरे वाटत नाहीये का, औषध देऊ का, तुझ्यासाठी काय करू, असे एक ना दोन, आरती सत्यजितच्या मागे भुणभुण लावते. त्याचा मनस्वी कंटाळा येऊन दोघांमध्ये भांडण होते. ते वेगळे राहायला लागतात. सत्यजितचेही आरतीवर प्रेम आहे. पण ते सारखे सारखे ‘व्यक्त’ करणे हा त्याचा पिंड नाही. म्हणून सत्यजित-आरती यांच्यात भांडण होते. ती घर सोडून जाते आणि नंतर ती, त्यांचे नाते सगळेच बदलते, नवे होते.
चपखल संवाद, अनुरूप गीत-संगीत आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे नेत्रसुखद चित्रण हे जसे या चित्रपटाचे बलस्थान म्हणता येईल, त्याचबरोबर मुक्ता बर्वे आणि स्वप्निल जोशी यांनी आपल्या भूमिका अधिक चांगल्या पद्धतीने साकारल्या आहेत. दोघांचा अभिनयही एकमेकांना पूरक आणि चांगला झाल्यामुळे चित्रपट प्रेक्षकाला भावतो. संपूर्ण चित्रपट एकतर सत्यजितच्या घरात, त्याच्या ऑफिसात, हॉटेलमध्ये, आरतीच्या ऑफिसात नाही तर आरतीची बहीण रेवाच्या घरात असा ‘इनडोअर’ चित्रीकरणात करण्यात आला आहे. तरीसुद्धा चित्रचौकटी नेत्रसुखद, ताज्या, नव्या वाटण्याची किमया छायालेखकाने केली आहे. त्यामुळे प्रेक्षक कंटाळत नाही. मध्यंतरापूर्वी काही वेळ चित्रपटाचा वेग कमी झाला आहे; परंतु मध्यंतरानंतर तो अधिक पकड घेतो. नव्यानेच लग्न झालेल्या पती-पत्नी नात्यामधील आजच्या पिढीचा काहीसा गोंधळ, काही अतिशय बारीक गोष्टी हळुवार पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न दिग्दर्शकाने केला आहे.
मुक्ता बर्वेने आतापर्यंत प्रेमकथापटांमध्ये साकारलेल्या व्यक्तिरेखेपेक्षा या चित्रपटातील आरती अधिक सरस साकारली आहे. चित्रपटाची सुरुवात आणि शेवट करताना गाणी आणि छायाचित्रणाचा सुंदर मिलाफ असे मिश्रण चित्रपटकर्त्यांनी खूप छान पद्धतीने केले आहे.
मंगलाष्टक वन्स मोअर
निर्माती – रेणू देसाई
लेखक- दिग्दर्शक – समीर हेमंत जोशी
छायालेखक – संजय जाधव
गीते – गुरू ठाकूर
संगीत – नीलेश मोहरीर
कलावंत – मुक्ता बर्वे, स्वप्निल जोशी, सई ताम्हणकर, कादंबरी कदम, हेमंत ढोमे व अन्य.

सुनील नांदगावकर

documentary on mangroves of maharashtra
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : पावलोपावली नवशिक्षण
rajkaran gela Mishit marathi movie on April 19 in theaters
‘राजकारण गेलं मिशीत’ १९ एप्रिलला चित्रपटगृहात
Loksatta kalakaran Architecture heritage and reality
कलाकारण: वास्तुरचना, वारसा आणि वास्तव!
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!