ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात आता सामान्य पर्यटक व विद्यार्थ्यांना अवघ्या १५० रुपयात मिनीबसच्या माध्यमातून वनभ्रमंती करता येणार आहे. आज, बुधवारी सकाळी ७.३० वाजता मोहुर्ली प्रवेशव्दारावरून ही बससेवा सुरू झाल्याने सर्वसामान्य पर्यटकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
पट्टेदार वाघांच्या वास्तव्याने देशविदेशातील पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र बनलेल्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील वनभ्रमंती गेल्या काही वर्षांपासून महागली आहे. सर्वसामान्य पर्यटक असो की गर्भ श्रीमंत पर्यटक सर्वाना ताडोबात जंगल सफारीसाठी किमान ५ ते ६ हजार रुपये खर्च येतो. त्यामुळे सामान्य पर्यटक, तसेच गरीब पर्यटक व विद्यार्थ्यांना ही भ्रमंती करणे कठीण झाले होते. नेमकी हीच बाब लक्षात घेऊन ताडोबा व्यवस्थापनाने मिनीबस सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. ताडोबा फाऊंडेशनने १५ लाख रुपये खर्च करून २० आसनक्षमता असलेल्या मिनिबसची खरेदी केली. त्यानंतर काल मंगळवारी ही बस ताडोबात दाखल झाली व आज सकाळी ७.३० वाजतापासून या बससेवेला सुरुवातही झाली.
या बसने ताडोबात वनभ्रमंती करण्यासाठी सर्वसामान्य पर्यटकांना सुटीचे दिवस वगळता सोमवार ते शुक्रवारा या दिवसासाठी १५० रुपये प्रती व्यक्तीप्रमाणे जंगल सफारी करता येणार आहे, तर सुटीचे दिवस म्हणजे शासकीय सुटी व रविवार, शनिवारी २०० रुपये प्रती व्यक्ती शुल्क आकारले जाणार आहे. ही मिनीबस मोहुर्ली-तेलिया तलाव-खातोडा-जामनी मेडो-पांढरपौनी-नवेगाव या मार्गाने जाणार आहे, तर परतीचा प्रवास नवेगाव-पांढरपवनी-ताडोबा-खातोडा या मार्गाने मोहुर्ली येथे परत येणार आहे. ही बस सकाळी ७.३० ते ११.३० व दुपारी ३.३० ते ६.३० पर्यंत जंगलात सफारी करेल. ही बससेवा ३० जूनपर्यंत सुरू राहणार आहे. पर्यटकांसाठी ही बस मोहुर्ली येथून प्रवेश करणार असून पहिले येणाऱ्या १९ पर्यटकांना प्रवेश दिला जाणार आहे, तसेच दहा पर्यटक असणे आवश्यक आहे. या बसचा सर्वाधिक फायदा सामान्य पर्यटकांसोबतच विद्यार्थी, शालेय सहलींना मोठय़ा प्रमाणात होणार आहे.