शहर परिसरातील रस्ता रुंदीकरणाची कामे हाती घेताना कोणतेही नियोजन केले नसल्याने सध्या शहर ठिकठिकाणी खणून ठेवल्याचे दिसत आहे. अर्धवट कामांमुळे कुठे गटारीचे पाणी रस्त्यांवरून वाहते तर काही ठिकाणी संपूर्ण रस्ताच बंद असल्याने व्यावसायिकांना आपली दुकानेही बंद ठेवणे भाग पडले आहे. काही ठिकाणी जीव धोक्यात घालून नागरिकांना आपले घर गाठावे लागते. काही कामे पूर्णत्वास गेली तरी रस्ता खुला न केल्यामुळे रस्त्याच्या एका बाजुवर दोन्ही बाजुंच्या वाहनांचा बोजा पडला आहे. परिणामी, वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. उपरोक्त ठिकाणी काही दुर्घटना घडल्यास त्यास जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
आगामी कुंभमेळ्याच्या पाश्र्वभूमीवर तसेच शहराचा वाढता विस्तार लक्षात घेऊन शहरात सध्या मुंबई नाका, सारडा सर्कल ते दूध बाजार, गणेशवाडी, मखमलाबाद नाका आणि धुमाळ पॉईंटसह अनेक ठिकाणी रस्ता रुंदीकरणाची कामे हाती घेण्यात आली आहेत. साधारणत: दीड महिन्यापूर्वी अतिक्रमण निर्मूलन मोहिमेंतर्गत मुंबई नाका परिसरातील अतिक्रमणे हटविण्यात आली. या जागेवर पुन्हा अतिक्रमण होऊ नये याकरिता रस्ता रुंदीकरणाचा पर्याय स्वीकारून तातडीने रस्त्याचे खोदकाम, खडीकरण हाती घेण्यात आले. रुंदीकरणाच्या नावाखाली जुना आग्रारोडवर दुतर्फा खोदकाम करण्यास सुरूवात झाली आहे. यामुळे मुळात अरूंद असलेला रस्ता अधिकच चिंचोळा झाला. शिवाय, भूमिगत वायरचे जाळे ठिकठिकाणी उघडे पडले. जलवाहिन्या तुटल्याने मध्यंतरी पाण्याची गळती येथे झाली होती. परिसरात सकाळी तसेच सायंकाळी वाहतुकीची कोंडी होते. त्यात खडी व तत्सम साहित्य रस्त्यालगत पडून आहे. यामुळे वाहतुकीत अवरोध निर्माण झाला आहे. दूध बाजार ते सारडा सर्कल परिसराची परिस्थिती याहून वेगळी नाही. सारडा सर्कलकडून दूध बाजाराकडे येणाऱ्या रस्त्यावर भंगार, लोखंडी साहित्य, टायर, विद्युत उपकरणे दुरूस्ती, कुशन्स अशी १२५ हुन अधिक दुकाने आहेत. या रस्त्याचे काम चार महिन्यांपासून सुरू आहे. सद्यस्थितीत एका बाजुचे काम अंतीम टप्प्यात आहे. दुसऱ्या बाजूला बांधकामाचे साहित्य अस्ताव्यस्त पडले आहे. यामुळे हा संपूर्ण रस्ता वाहतुकीसाठी बंद असून स्थानिक व्यावसायिकांचा व्यवसाय अडचणीत सापडला आहे. वाहने येण्यासाठी जागा नसल्याने ग्राहकांनी पाठ फिरविली असून हे काम तात्काळ पूर्ण करण्याची मागणी व्यावसायिकांनी केली आहे.
गणेशवाडी परिसरात दुतर्फा खोदकाम केल्यामुळे ठिकठिकाणी गटारीचे पाणी रस्त्यावरून वहात आहे. या ठिकाणी ‘ड्रेनेज’ उघडे पडले आहेत. गटारीचे पाणी व ढापे नसल्याने स्थानिकांना दरुगधीचा सामना करावा लागतो. रस्त्याचे काम सुरू असल्याची माहिती देण्यासाठी कोणताही फलक नाही. खडीमुळे अनेकदा वाहने ‘पंक्चर’ होतात तर काही ठिकाणी खडीवर सांडपाणी आल्याने वाहने घसरून अपघातही होत असल्याचे स्थानिक नागरिक सांगतात. बांधकाम साहित्य रस्त्यावर विखुरलेले आहे. या भागात जवळच टपाल कार्यालय, सार्वजनिक वाचनालय, अभ्यासिका तसेच आयुर्वेद महाविद्यालय असल्याने विद्यार्थी व नागरिकांची वर्दळ असते. परंतु, विस्तारीकरणाच्या कामामुळे सर्वाना बेजार केले आहे. काम सुरू झाल्यापासून आजतागायत नगरसेवक वा पालिका अधिकारी कामाची पाहणी करण्यास आले नसल्याची तक्रारही केली जाते. मखमलाबाद नाक्यावर वेगळीच समस्या आहे. रामवाडी ते पेठ फाटा या रस्त्याच्या विस्तारीकरणाचे एका बाजुचे काम पूर्ण झाले आहे. परंतु, तो रस्ता अद्याप वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला आहे. यामुळे एका बाजुने दोन्हीकडील वाहतूक होते. या ठिकाणी नागरिकांना पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. एकाच बाजुने दुतर्फा वाहतूक सुरू असल्याने पादचारी व शाळकरी विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडणे अवघड बनते. वाहनधारकांना कोंडीत अडकून पडावे लागते.
धुमाळ पॉइंटवर महिनाभरापासून सुरू असलेल्या कामामुळे ५० हून अधिक व्यवसायांवर मंदीचे सावट पसरले आहे. खोदकामामुळे आवाज व धुळ यामुळे नागरीक त्रस्त आहेत. ग्राहकांनी पाठ फिरविल्याने काहींनी आपला व्यवसाय बंद करण्याचा अथवा स्थलांतरीत करण्याचा निर्णय घेतला आहे. या अरूंद रस्त्यामुळे वाहनधारकांमध्ये वाद विवाद होत आहेत. खोदकामात रस्त्याच्या कडेला असलेली दोन-तीन ‘ड्रेनेज’ फुटल्याने सांडपाणी रस्त्यावर येते. या दरुगधीयुक्त पाण्याचा सामना कसा करायचा, हा प्रश्न स्थानिकांना भेडसावत आहे. खडीमुळे अनेकदा वाहने ‘पंक्चर’ होतात तर काही ठिकाणी खडीवर सांडपाणी आल्याने वाहने घसरून अपघातही होतात