भारत संचार निगम अर्थात बीएसएनएल वाचविण्यासाठी अधिकारी व कर्मचारी यांना सर्व प्रकारची मदत करण्यात येईल, असे आश्वासन खा. हेमंत गोडसे यांनी दिले. ओझर येथे बीएसएनएल एम्प्लाइज युनियनचे पाचवे विभागीय अधिवेशन झाले. याप्रसंगी ते बोलत होते. आ. अनिल कदम, वरिष्ठ महाप्रबंधक प्रवीण मल्होत्रा, नाशिकचे महाप्रबंधक सुरेश प्रजापती, बीएसएनएलईयूचे महाराष्ट्र परिमंडळ सचिव नागेश नलावडे, संघटनेचे दिल्लीचे सहसचिव जॉन वर्गिस आदी यावेळी उपस्थित होते. बीएसएनएलईयूचे नाशिक जिल्हा सचिव घनश्याम वाघ यांनी प्रास्तविक केले. स्वागताध्यक्ष आ. कदम तसेच प्रजापती, मल्होत्रा, वर्गिस, पुरुषोत्तम गेडाम, गणेश मठपती आदींची भाषणे झाली. अधिवेशनाच्या दुसऱ्या सत्रात महाराष्ट्र परिमंडळाचे सचिव नागेश नलावडे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी नाशिक जिल्हा कार्यकारिणीची निवड करण्यात आली.  जिल्हाध्यक्ष अशोक बच्छाव आणि जिल्हा सचिव घनश्याम वाघ यांच्या नेतृत्वाखालील समितीचीच सर्वानुमते फेरनिवड करण्यात आली. खजिनदारपदी जयंत धामणे हे आहेत. अधिवेशनात विकास जोशी यांनी निरीक्षक म्हणून काम पाहिले. अधिवेशनात सेवानिवृत्त राजभाषा अधिकारी बी. एस. नकवाल यांचा खा. गोडसे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन विजय गोळेसर यांनी केले.