दसऱ्याच्या दिवशी कल्याण येथे प्लॅटफॉर्म क्रमांक एकजवळ लोकल गाडीचा एक डबा घसरला आणि उपनगरीय वाहतूक कोलमडली. या घटनेची चौकशी चालू असली, तरी याच ठिकाणी दसऱ्याच्या पंधरा दिवस आधीही लोकल गाडी घसरली होती, असे निदर्शनास आले आहे. मात्र त्या वेळी त्या घटनेचा फारसा परिणाम उपनगरीय सेवेवर झाला नसल्याने त्याची दखल घेतली गेली नाही. एकाच ठिकाणी अशा दोन घटना घडण्यामागे नेमके काय कारण आहे, याचा शोध आता रेल्वे प्रशासन घेत आहे.
कल्याणच्या प्लॅटफॉर्म क्रमांक एकवरून थेट अप जलद मार्गावर येणाऱ्या एका लोकल गाडीचा सातवा डबा रुळावरून घसरला होता. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नसले, तरी त्याचा परिणाम उपनगरीय सेवेवर मोठय़ा प्रमाणात झाला होता. सणावाराच्या निमित्ताने बाहेर पडलेल्या प्रवाशांना रेल्वेरूळांवरून दोन स्थानकांमधील अंतर पायी कापावे लागले होते. रेल्वे कर्मचाऱ्यांच्या अथक प्रयत्नांनंतर तब्बल चार तासांनी हा डबा उभा करून गाडी कारशेडमध्ये पाठवण्यात आली.
मात्र दसऱ्याच्या बरोबर पंधरा दिवस आधी याच ठिकाणी एक गाडी घसरली होती, असे आता स्पष्ट होत आहे. ही गाडी घसरल्यानंतर वास्तविक मध्य रेल्वेने या रूळांची, तेथील क्रॉसओव्हरवर असलेल्या चापांची काळजी घेणे आणि देखभाल करणे आवश्यक होते. मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्यानेच दसऱ्याच्या दिवशीचा अपघात घडला असावा, असा प्राथमिक अंदाज रेल्वेच्या गोटांतूनच व्यक्त होत आहे.
प्लॅटफॉर्म क्रमांक एकवरून साधारणपणे फक्त अप धीम्या मार्गावरच गाडय़ा वळवल्या जातात. कल्याणहून सुटणाऱ्या जलद गाडय़ा बहुतांश वेळा जलद मार्गाजवळच्या प्लॅटफॉर्मवरूनच सोडल्या जातात. प्लॅटफॉर्म क्रमांक एकवरून अप जलद मार्गावर गाडय़ा वळवण्यासाठी कल्याण येथे असलेला क्रॉसओव्हर वर्षभरातून दोन ते तीन वेळा आणीबाणीच्या परिस्थितीतच वापरला जातो. त्यामुळे हा खटका फारसा वापरात नसतो.
दसऱ्याआधी पंधरा दिवस ठाकुर्ली येथे सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला होता. त्यामुळे गाडय़ांची वाहतूक उशिराने धावत होती. परिणामी त्या वेळी कल्याणच्या प्लॅटफॉर्म क्रमांक एकवरील गाडी जलद मार्गावरून मुंबईकडे नेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्या वेळी एक गाडी घसरली होती. मात्र त्याचा परिणाम वाहतुकीवर जास्त न झाल्याने ती घटना फारशी प्रकाशात आली नव्हती.
या वेळी तपासणी करताना या रेल्वेमार्गावरील क्रॉसओव्हरला छोटे छिद्र पडले असल्याचे निदर्शनास आले होते. मात्र हा क्रॉसओव्हर फारसा वापरला जात नसल्याने त्याकडे लक्ष देण्याऐवजी नेहमी वापरल्या जाणाऱ्या क्रॉसओव्हरची आणि चापांची दुरुस्ती करण्यात आली होती. मात्र दसऱ्याच्या दिवशी ऐन गर्दीच्या वेळी ही गाडी घसरल्याने ही बाब निदर्शनास आली आहे. हे क्रॉसओव्हरजवळील छिद्र थोडे मोठे झाल्याने हा अपघात झाल्याचे प्राथमिक कारणही काही रेल्वे अधिकारी व्यक्त करत आहेत. मात्र देखभाल-दुरुस्तीतील या हलगर्जीपणाबाबत काय पावले उचलता येतील, याचा विचार रेल्वे करत आहे.