धावत्या लोकलच्या दोन डब्यांना जोडून ठेवणारे कपलिंग तुटल्याने या गाडीचे डबे एकमेकांपासून वेगळे होण्याची घटना सोमवारी घडल्यानंतर मध्य रेल्वेने या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली आहे. प्राथमिक तपासणीनंतर हा अपघात रेल्वेच्या सुटय़ा भागांतील दोषांमुळेच झाल्याचे समोर येत असले, तरी सिमेन्स कंपनीच्या या डब्यांमध्येच दोष (मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट) असल्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. ही शक्यता खरी ठरल्यास रेल्वे या प्रकाराची गंभीर दखल घेईल, असे मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक मुकेश निगम यांनी सांगितले.
मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसहून संध्याकाळी ५.२२ वाजता सुटणाऱ्या कल्याण अर्धजलद गाडीच्या सातव्या आणि आठव्या डब्यामधील ‘ड्रॉ बार पिन’ तुटली. ही गाडी दिवा आणि कोपर या दोन स्थानकांदरम्यान असताना गाडीचे आठपासून बारापर्यंत पाच डबे आधीच्या डब्यांपासून विलग झाले. सुदैवाने या प्रकरणात जीवितहानी झाली नाही. मात्र रेल्वेने तात्काळ याबाबत चौकशी होईल, असे जाहीर केले.
या प्रकरणी प्राथमिक तपास केला असता सुटय़ा भागातील दोषांमुळे हा अपघात झाल्याचे दिसत आहे, असे निगम यांनी सांगितले. ड्रॉ बार पिन दोन्ही डब्यांना जोडणाऱ्या दांडय़ाला एकत्र ठेवते. हा भाग एकसंध असणे अपेक्षित आहे. मात्र तपास केला असता, दोन वेगवेगळ्या धातूंची जोडणी (वेल्डिंग) करून हा भाग तयार केल्याचे दिसते. हा डबा सिमेन्स कंपनीचा होता. पुढील ३५ वर्षे या गाडय़ा कोणत्याही मोठय़ा बिघाडाविना धावतील, असे कंपनीतर्फे सांगण्यात आले होते. मात्र धातूंची जोडणी करून असे भाग तयार केले गेले असतील, तर मग ही गंभीर बाब आहे आणि रेल्वे याची गंभीर दखल घेईल, असे निगम यांनी स्पष्ट केले.
मध्य रेल्वेच्या उपनगरीय गाडय़ा दर १८ महिन्यांनी संपूर्ण दुरुस्तीसाठी कारखान्यात जातात. सदर गाडीची दुरुस्ती डिसेंबर २०१२मध्ये झाली होती. म्हणजेच पुढील चारच महिन्यांत ही गाडी दुरुस्तीसाठी जाणार होती. मात्र त्याआधीच ही घटना घडल्याने देखभालीबद्दलही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. तसेच सिमेन्सच्या प्रत्येक डब्यामध्ये हा बिघाड असल्यास तो दुरुस्त करणे रेल्वेच्या आवाक्याबाहेरचे आहे. हे काम उत्पादक कंपनीचे असून त्याचा फटका रेल्वेच्या सेवांना बसू शकतो, अशी माहिती सूत्रांनी दिली.