गुप्तचर यंत्रणेकडून येणाऱ्या दक्षतेच्या इशाऱ्यांमध्ये सध्या कमालीची वाढ झाली असून या प्रत्येक इशाऱ्यात ठोस काहीही नसले तरी पोलिसांना खूपच सावध व्हावे लागत आहे. या प्रत्येक इशाऱ्याची शहानिशा करताना पोलिसांची दमछाक होत आहे. कधी कधी दिवसाकाठी २० ते ३० इशारे मिळत आहेत आणि त्यापैकी कुठले खरे आहेत, याचा अंदाज येत नसल्यामुळे सर्वच इशारे गांभीर्याने पाहिले जातात, असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने स्पष्ट केले. या इशाऱ्यात ठोस माहिती नसली तरी आम्हाला त्याचा पाठपुरावा करावा लागत असल्याचेही या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.
काही परकीय नागरिक (येमेनचे असू शकतात) मुंबईवर हल्ला करण्यासाठी समुद्रमार्गे आले आहेत, अशा एका इशाऱ्याने पोलिसांची झोपच उडवून टाकली. पोलिसांतील सर्व यंत्रणा या इशाऱ्याची शहानिशा करण्यासाठी जिवाचा आटापिटा करू लागली. पोलिसांच्या सुट्टय़ाही रद्द करण्यात आल्या. या इशाऱ्यामध्ये निश्चित अशी काहीही माहिती नव्हती. त्यामुळे या परकीय नागरिकांचा शोध नेमका कुठे घ्यायचा याबाबत पोलीस यंत्रणाही साशंक होती. अखेरीस विशेष शाखेअंतर्गत येणाऱ्या परकीय नागरिक नोंदणी कक्षातील सर्व नोंदी तपासण्यात आल्या. परकीय नागरिक राहात असलेल्या सर्व हॉटेल्स, लॉजेसची झडती घेण्यात आली. परंतु संशयास्पद काहीही आढळले नाही. अजून काही शक्यता असू शकतात का, याबाबतही तर्कवितर्क लढविण्यात आले. परंतु हाती काहीही लागले नाही. त्यामुळे अखेरीस आठवडाभराच्या मोहिमेनंतर शोध थांबविण्यात आला.
राज्य पोलिसांच्या गुप्तचर विभागाकडे दररोज अनेक दक्षतेचे इशारे येत असतात. परंतु यापैकी ज्या इशाऱ्यात गंभीर बाबी असतील, तेच इशारे पुढे पाठविले जातात. या इशाऱ्यांची शहानिशा करण्याची जबाबदारी संबंधित आयुक्तालयांवर टाकली जाते. कुठलीही जोखीम नको, त्यामुळे आयुक्तालयाकडून या सर्वच इशाऱ्यांची शहानिशा करण्यास सांगितले जाते. त्यात तथ्य आढळले नाही तरी चालेल. परंतु दुर्लक्ष करू नका, असेच आदेश दिले जातात याकडेही या वरिष्ठ अधिकाऱ्याने लक्ष वेधले. काही वेळा यापैकी काही इशारे इतके हास्यास्पद असतात की, त्याची शहानिशा करणेही शक्य नसल्याचेही या अधिकाऱ्याने स्पष्ट केले. सिद्धिविनायक मंदिर वा हाजी अली दग्र्याला दहशतवाद्यांकडून धोका असल्याचा इशारा कायम असतो. परंतु नेमका धोका कोठून आहे वा त्याबाबत काही हालचाली सुरू आहेत का, याची माहिती आतापर्यंत एकाही इशाऱ्यातून सापडलेली नाही, असेही या अधिकाऱ्याने सांगितले. समुद्रमार्गे दहशतवादी येणार असल्याचे इशारेही अशाच पद्धतीचे असतात. मात्र नेमक्या कोणत्या किनाऱ्यावरून वा कुठल्या भागातून ते येण्याची शक्यता आहे, याबाबत ठोस काहीही नसते, याकडेही या अधिकाऱ्याने लक्ष वेधले.