मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर होणाऱ्या अपघातातील जखमींवर उपचार करण्यासाठी पनवेल शहरातील रुग्णालयाशिवाय दुसरा पर्याय नाही. त्यामुळे अपघातानंतरचे सोपस्कार पूर्ण करण्याची जबाबदारी नवी मुंबई पोलिसांवर येऊन पडत असल्याने केवळ भौगोलिकदृष्टय़ा रायगड जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या कार्यक्षेत्रात असणाऱ्या या मार्गाचा अर्धा भाग व तेथील पोलीस ठाणी नवी मुंबई आयुक्तालयात वर्ग करण्यात यावी, असा प्रस्ताव पाठविण्यात आला असून त्या दृष्टीने गृहविभागाने चाचपणी करण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी रायगड जिल्हाधिकाऱ्यांचा अभिप्राय मागविण्यात आला आहे.
नवी मुंबई पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रातील लोकसंख्या वाढत असून त्यामुळे गुन्हेगारीचे प्रमाणही वाढत आहे. या वाढत्या गुन्हेगारीबरोबरच या आयुक्तालयातील पोलिसांची जबाबदारीही दिवसागणिक वाढू लागली आहे. नवी मुंबईला लाभलेला ६० किलोमीटरचा सागरी किनारा, उरण येथील संरक्षण खात्याचा दारूगोळा, जेएनपीटी हे देशातील सर्वात मोठे बंदर यामुळे नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात अलीकडे मोठय़ा प्रमाणात भरती करण्यात आली. वाढत्या लोकसंख्येमुळे काही माहिन्यांतच १६ पोलीस ठाण्यांची २० पोलीस ठाणी झाली आहेत. त्या तुलनेत उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यात वाढ झालेली नाही. त्यासाठी आणखी दोन उपायुक्त व सहा साहाय्यक पोलीस आयुक्तांची या शहराला गरज आहे. पोलीस आयुक्तालयात राखीव असणाऱ्या ६०० पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस ठाणी व वाहतूक शाखेत पाठविण्यात आल्याने सध्या शहरात ठिकठिकाणी पोलीसदादा दिसू लागला आहे.
नवी मुंबईतील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी स्वतंत्र पोलीस ठाण्याचा प्रस्ताव आतापासूनच पाठविण्यात आला आहे. मुख्यालयाचे पोलीस उपायुक्त अशोक मोराळे यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. या पोलीस ठाण्याशिवाय कळंबोली-पनवेलदरम्यान आणखी एक व उलवा येथे एका पोलीस ठाण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. रायगड जिल्हा अधीक्षक अखत्यारीत असणारे खोपोली, रसायनी आणि खालापूर पोलीस ठाण्याचा कारभार नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात वर्ग करण्याचा प्रस्ताव यापूर्वीच देण्यात आला आहे. यामुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेचा अमृतांजन कमानीपर्यंतचा भाग नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत येणार आहे. या मार्गावर सर्वाधिक अपघात याच भागात होत असल्याने जखमींच्या उपचारांसाठी तसेच मृतांच्या शवविच्छेदनासाठी पनवेल शहरातील शासकीय तसेच खासगी रुग्णालयाशिवाय दुसरा पर्याय नाही. हा भाग नवी मुंबई पोलीस आयुक्तालय परिसरात येत असल्याने रुग्णालयात जाऊन जखमींचे सर्व जबाब तसेच सोपस्कार पनवेल पोलिसांना पार पाडावे लागत असल्याने हा संपूर्ण भाग रायगड अधीक्षक कार्यक्षेत्रातून वगळून नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात वर्ग करण्यात यावा, असा प्रस्ताव देण्यात आला आहे. त्या दृष्टीने गृहविभागाने रायगड जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांचे अभिप्राय मागविले आहेत.