बी.कॉम.पाठोपाठ बी.एस्सी.च्या विद्यार्थ्यांना एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या केंद्रांवर सहाव्या आणि पाचव्या सत्राची परीक्षा द्यायला लावणाऱ्या विद्यापीठाने अखेर बी.एस्सी.च्या वेळापत्रकात बदल केले आहेत. यामुळे बी.एस्सी.च्या सुमारे एक हजार विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
बी.एस्सी.च्या विद्यार्थ्यांनाही बी.कॉम.च्या विद्यार्थ्यांसारखेच एकाच दिवशी दोन परीक्षा द्यावा लागणार हे वृत्त मुंबई वृत्तांतमध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर विद्यापीठाने वेळापत्रकात बदल केले. बी.एस्सी.च्या भौतिकशास्त्र शाखेच्या सहाव्या सत्राची परीक्षा सुरू आहे. पाचव्या सत्राची परीक्षाही लगेचच सुरू होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना पाचव्या सत्रात इलेक्ट्रोडायनामिक्स या विषयात एटीकेटी लागली आहे अशा विद्यार्थ्यांना २३ एप्रिल रोजी एकाच दिवशी दोन परीक्षा द्याव्या लागणार होत्या. त्याही दोन वेगवेगळ्या केंद्रावर, कारण या दिवशी सहाव्या सत्राची इलेक्ट्रॉनिक्स या विषयाची परीक्षा दुपारी ३ ते ५.३० या वेळात होणार आहे. तर सकाळी ११ ते १.३० या वेळात पाचव्या सत्राची परीक्षा द्यावी लागणार होती. हाच प्रकार २१ व २२ एप्रिल रोजीही होणार होता. ही बाब अधिसभा सदस्य सुधाकर तांबोळी यांनी परीक्षा विभागाच्या लक्षात आणून दिली. यानंतर परीक्षा विभागाने चूक मान्य करत शनिवारी अभ्यास मंडळाची बैठक झाली व पाचव्या सत्राची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. नवीन वेळापत्रकानुसार २१ व २२ एप्रिल रोजी होणारी परीक्षा आता ३० एप्रिल रोजी अनुक्रमे सकाळी ११ ते १.३० व दुपारी ३ ते ५ या वेळात होणार आहे, तर २३ एप्रिल रोजी होणारी परीक्षा आता २ मे रोजी सकाळी ११ ते १.३० या वेळात होणार आहे. वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे. वेळापत्रक तयार करत असताना विद्यापीठ प्रशासन त्याकडे फारसे गांभीर्याने पाहात नसल्याचे या प्रकरणातून पुन्हा एकदा समोर आल्याचे व्यक्त करत तांबोळी यांनी प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर नाराजी व्यक्त केली.