राज्यातील सर्व विद्यापीठांनी एकत्रित येऊन सुरू केलेल्या ‘मुनीजन’ स्वच्छ भारत अभियानातून गुणीजन तयार होतील, असा आशावाद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. स्वच्छता हे एक जीवनमूल्य असून ते प्रत्येकाने स्वीकारल्यास आपला देश खऱ्या अर्थाने स्वच्छ आणि सुंदर होईल असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना कोणतेही काम करण्याच्या तीन पायऱ्या सांगितल्या.
‘मुनीजन’ या उपक्रमाचे उद्घाटन गुरुवारी मुंबई विद्यापीठातील दिक्षांत सभागृहात पार पडले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या उपक्रमात राज्यातील १८ विद्यापीठांतील सुमारे ४५०० महाविद्यालयांच्यावतीने हे स्वच्छता अभियान राबविले जाणार आहे. या कार्यक्रमात उच्च व तंत्र शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना स्वच्छता आणि समृद्धी या एकाच नाण्याच्या दोन बाजू असून राज्यातील युवाशक्ती या कामात पुढे आली तर हे अभियान नक्कीच यशस्वी होईल असे नमूद केले. हे अभियान राबविण्यासाठी पाच वर्षांचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. यामध्ये सवरेत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महाविद्यालयाला कुलगुरू चषकाने गौरविले जाणार आहे. असाच गौरव राज्य सरकारतर्फेही केला जावा, अशी सूचना मुख्यमंत्र्यांना व्यासपीठावरूनच तावडे यांनी केली. या कार्यक्रमाला सर्व विद्यापीठांचे कुलगुरू आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुनीजन या स्वच्छता मोहिमेचे दिमाखात उद्घाटन सोहळा करणाऱ्या मुंबई विद्यापीठाने कालिना संकुलातील तरणतलाव तसेच इतर इमारतींवरील कचरा स्वच्छ करावा असे अधिसभा व युवासेनेचे सदस्य प्रदीप सावंत यांनी स्पष्ट केले. याबाबत वारंवार तक्रार करूनही विद्यापीठ स्वच्छता करत नसल्याचेही त्यांनी नमूद केले. तर या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याबाबत अधिसभा सदस्यांना आदल्या दिवशी रात्री उशिरा लघुसंदेश पाठविण्यात आल्याबाबतही त्यांनी नाराजी व्यक्त केली.