मुंबईतील वाहतूक व्यवस्था सुरळीत व्हावी आणि मुंबई महानगर प्रदेशातील वाहतुकीचे प्रश्न सुटावेत, यासाठी मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या माध्यमातून (एमआरव्हीसी) राबवण्यात येणाऱ्या एमयूटीपी प्रकल्पांचा दुसरा टप्पा पूर्ण झाला नसतानाही तिसऱ्या टप्प्यातील प्रकल्पांच्या कामाची सुरुवात करणाऱ्या रेल्वे मंत्रालयाने सोमवारी चौथ्या टप्प्याचीही घोषणा करून टाकली आहे. ‘एमयूटीपी-३’ प्रकल्प पूर्ण होईपर्यंत मुंबईच्या गरजा वाढणार आहेत. त्या गरजांचा विचार करून आराखडा तयार करायला हवा, या खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केलेल्या सूचनेची दखल घेऊन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी एमयूटीपी-४ प्रकल्पाची घोषणा केली. या प्रकल्पाचा आराखडा तयार करण्यास एमआरव्हीसीने सुरुवात करावी, असे आदेशही प्रभू यांनी दिले आहेत.
वाहतूक व्यवस्थेतील अनेक गाजरे मुंबईकरांसमोर ठेवणाऱ्या मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट (एमयूटीपी) या प्रकल्पाचे तीन टप्पे याआधी जाहीर करण्यात आले होते. त्यापैकी तिसऱ्या टप्प्यातील अनेक प्रकल्प बासनात गुंडाळून अत्यंत मवाळ अशा तिसऱ्या टप्प्याचे काम सुरू झाल्याची घोषणा रविवारी करण्यात आली. प्रत्यक्षात अद्याप एमयूटीपी-२मधील काही प्रकल्प पूर्ण झालेले नाहीत. तिसरा टप्पा पूर्ण होण्यास किमान पाच वर्षांचा कालावधी लागणार आहे. तोपर्यंत मुंबईच्या गरजा बदलतील व हे प्रकल्प त्या गरजांसाठी अपुरे ठरतील. त्यामुळे रेल्वेने आत्ताच त्याचा विचार करायला हवा, अशी सूचना कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केली. त्यानंतर रेल्वेमंत्री प्रभू यांनी एमआरव्हीसीचे व्यवस्थापकीय संचालक प्रभात सहाय यांना या एमयूटीपी-४ प्रकल्पाची आखणी करण्याचे आदेश दिले.
या आदेशानंतर आता एमआरव्हीसी राज्य सरकार आणि एमएमआरडीए यांच्यासह एक बैठक घेणार आहे. मुंबईशी संबंधित प्रकल्पांची जंत्री खूप मोठी आहे. त्यातील कोणत्या प्रकल्पांना एमयूटीपी-४मध्ये प्राधान्य द्यायचे, याची चर्चा या बैठकीत होईल. सागरी मार्ग, मेट्रो असे अनेक प्रकल्प सध्या राज्य सरकार आणि एमएमआरडीए मुंबई महानगर प्रदेशासाठी राबवत आहे. त्या प्रकल्पांशिवाय इतर महत्त्वाचे प्रकल्प कोणते, याचा अभ्यास या बैठकीत केला जाईल, असे एमआरव्हीसीचे व्यवस्थापकीय संचालक प्रभात सहाय यांनी सांगितले.
सध्या मुंबईकरांच्या सोयीसाठी विरार-वसई-पनवेल उपनगरीय रेल्वेमार्ग, मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस-पनवेल जलद मार्ग, कल्याण-कर्जत किंवा कल्याण-कसारा (तिसरी-चौथी मार्गिका) किंवा बोरिवली-विरार (पाचवी-सहावी मार्गिका) असे अनेक प्रकल्प हाती घेणे आवश्यक आहे. राज्य सरकार आणि एमएमआरडीए यांच्याशी चर्चा करून त्यापैकी कोणत्या प्रकल्पांचा समावेश एमयूटीपी-४मध्ये करायचा, याचा निर्णय होईल, असे सहाय यांनी स्पष्ट केले.