गारपीट व अवकाळी पावसाच्या तडाख्यानंतर सोमवारी ६.३ अंशांची नीचांकी पातळी गाठणाऱ्या नाशिकच्या तापमानात दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी काहीशी वाढ होऊन ते ७.२ अंशांवर पोहोचले. काही भागात ढगाळ हवामान आणि वाऱ्याचा मंदावलेला वेग यांचा परिणाम तापमानावर झाल्याचे सांगण्यात आले. दिवसाही गारवा असल्याने गुलाबी थंडीचे आगमन झाल्याची सर्वसामान्यांची प्रतिक्रिया आहे.
नाशिकसह धुळे व जळगाव या भागात मागील आठवडय़ात गारांसह पाऊस झाला होता. त्यानंतर तीन ते चार दिवसांत थंडीने आपले अस्तित्व अधिक दाखविण्यास सुरुवात केली. सोमवारी सकाळी नाशिक शहरात ६.३ अंश या हंगामातील नीचांकी तापमानाची नोंद झाली. कडाक्याच्या थंडीमुळे नाशिककर गारठून गेले. उत्तर भारतात बर्फवृष्टी व थंडीची लाट असल्याने त्या भागातून वाहत येणाऱ्या वाऱ्याचा प्रभाव उत्तर महाराष्ट्रातील वातावरणावर पडतो. कडाक्याच्या थंडीमुळे सर्वाना हुडहुडी भरल्याचे चित्र दिसत आहे. कमालीच्या गारव्यामुळे दिवसभर उबदार कपडे परिधान करणे भाग पडले. सर्वसाधारणपणे दिवाळीनंतर थंडी जाणवायला लागते. यंदाच्या हंगामात त्यात सातत्य राहिले नाही. मागील आठवडय़ात नाशिकमध्ये १०.२ अंशांची नोंद झाली होती. पुढील आठ दिवसांत तापमान ४ अंशांनी कमी होऊन हंगामातील नीचांकी पातळीवर पोहोचले. दुसऱ्या दिवशी मात्र पुन्हा तापमानात काही अंशी वाढ झाली. मंगळवारी सकाळी ७.२ अंशांची नोंद झाल्याचे हवामानशास्त्र विभागाकडून सांगण्यात आले. तापमान काहीसे उंचावण्यामागे वातावरणातील घटक कारक ठरतात. सध्या काही भागांत ढगाळ वातावरण आहे. तसेच वाऱ्याचा वेगही मंदावलेला असल्याने तापमानात चढ-उतार होऊ शकते, असे सूत्रांकडून सांगण्यात आले. सर्वसामान्यांना गुलाबी थंडीचा मुक्काम किती काळ राहणार, याबद्दल उत्सुकता आहे. दुसरीकडे वातावरणातील घडामोडींमुळे द्राक्ष उत्पादकांमध्ये धास्ती पसरली आहे. थंडीचा मुक्काम कायम राहिल्यास द्राक्षमणी फुटण्याची शक्यता असते. तसेच भुरी रोगाचा प्रार्दुभाव होण्याचाही धोका आहे. यामुळे थंडीपासून बचाव करण्यासाठी वेगवेगळी औषधे फवारणीचे काम त्यांनी सुरू केले आहे.