दांडिया खेळताना वेळेचे भान ठेवा, दहा वाजता दांडिया बंद करावा लागणार आहे, त्यामुळे घडय़ाळाकडे लक्ष असू द्या, हे लक्ष पंधरा ऑक्टोंबर पर्यंत ठेवा, घडय़ाळच प्रत्येकाच्या जीवनात आनंद आणणारा आहे, हा प्रचार काही नवरात्रोत्सवात ऐकू येत आहे. प्रचार करणारी मंडळी राष्ट्रवादी काँग्रेसची असल्याचे त्यावरुन स्पष्ट दिसून येत आहे. त्यामुळे दांडिया खेळण्यासाठी आलेल्या आबाळवृध्दांना राष्ट्रवादीच्या घडयाळ या निशाणी लक्षात ठेवण्याचे सुतोवाच केले जात आहे. राष्ट्रवादीने अशा प्रकारे घडय़ाळाचा प्रचार केला असताना शिरवणे येथे शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी चक्क आश्विन महिन्यात भगव्या साडय़ासह हळदीकूंकू साजरा केला.
केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यातील विधानसभा निवडणूकीसाठी आदर्श आचारसंहिता जाहीर केल्याने अनेक उमेदवारांना नवरात्रोत्सव काळात शायनिंग मारता आली नाही. त्यामुळे प्रचारासाठी चालून आलेली नामी संधी अनेक उमेदवारांना गमवावी लागली. त्यावर उपाय म्हणून काही उमेदवारांनी प्रचारांचे नवनवीन फंडे शोधून काढलेले आहेत. त्यात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आपल्या चिन्हांचा प्रचार करण्यास सुरुवात केली आहे. मंगळवारी कोपरखैरणे उपनगरात राष्ट्रवादीचे सरचिटणीस व माजी खासदार संजीव नाईक प्रचारासाठी फिरत होते. नाईक यांच्यावर सध्या दोन्ही मतदार संघात वडिल गणेश नाईक व भाऊ संदीप नाईक यांच्यासाठी प्रचार करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यामुळे अनेक राष्ट्रवादी पुरस्कृत मंडळांच्या नवरात्सोवांना भेटी देण्याचा त्यांचा कार्यक्रम सुरु होता. सात साडेसातला सुरु झालेला हा भेटीगाठीच्या कार्यक्रमात संजीव नाईक घडय़ाळाचा मोठय़ा खुबीने प्रचार करीत असल्याचे आढळून आले. भेट दिलेल्या नवरात्रोत्सवात नुकताच कुठे दांडिया खेळण्यास सुरुवात होत होती. त्यावेळी शुभेच्छापर भाषण करताना नाईक यांनी दहा वाजेपर्यंत दांडिया खेळण्यास मुभा आहे. शेवटचे दोन दिवस ती बारा वाजेपर्यंत आहे. त्यामुळे घडय़ाळावर लक्ष ठेवा. घडय़ाळावरचे हे लक्ष ढळू देऊ नका ते १५ ऑक्टोबर पर्यंत तसेच राहू द्या असा घडयाळाचा प्रचार केला जात होता. राष्ट्रवादीने काढलेल्या या क्ृलप्ती बरोबरच सर्वसाधारपणे चैत्र महिन्यात संक्रातीनंतर सुरु होणारा हळदीकूंकू कार्यक्रम चक्क शिवसेनेच्या महिला आघाडीने आश्विन महिन्यात शिरवणे येथील नवरात्रोत्सावत साजरा केला. शिवेसनेचे बेलापूर मतदार संघातील उमेदवार विजय नाहटा यांच्या प्रचारासाठी घेण्यात आलेला ह्य़ा कार्यक्रमात भगव्या साडय़ांचा वापर करुन वातावरण भगवेमय करण्यात आले होते.