डोंबिवली पूर्व भागातील स्वामी समर्थ मठ, नांदिवली, भोपर, गांधीनगर भागांना जोडणाऱ्या नांदिवली नाल्यावर नवीन उड्डाण पूल उभारणीस पालिकेच्या महासभेने मान्यता दिली आहे. १ कोटी ३२ लाख खर्चाचा हा पूल १८ मीटर लांबीचा असणार आहे.
या नाल्यावरील सुमारे ३५ वर्षांपूर्वीचा उड्डाण पूल धोकादायक झाल्याने तो कोणत्याही वेळी कोसळण्याची शक्यता होती. त्यामुळे या नाल्यावर नवीन उड्डाण पूल उभारण्यात यावा म्हणून मनसेचे नगरसेवक राजन मराठे गेल्या दोन वर्षांपासून पालिकेत प्रयत्नशील होते. पालिका अभियंत्यांनी या पुलाची निकड विचारात घेऊन सर्वेक्षण केल्यानंतर नवीन उड्डाण पुलाचा प्रस्ताव तयार केला आहे. जुन्या पुलाच्या बाजूला हा नवीन उड्डाण पूल उभारण्यात येणार आहे. या पुलाची रुंदी १० मीटर व त्याखाली तीन गाळे असणार आहेत. दोन्ही बाजूला १५ मीटरचे पोहोच रस्ते तयार करण्यात येणार आहेत. या पुलासाठी आगामी पालिकेच्या अर्थसंकल्पात १ कोटी ३२ लाखांची तरतूद करण्यात आली आहे, असे नगरसेवक मराठे यांनी सांगितले. जुना पूल धोकादायक झाला आहे. या पुलावरून अवजड वाहने, शाळेच्या बस, रिक्षा वाहतूक सुरू असते. अनेक भाविक समर्थ मठात दर्शनासाठी ये-जा करीत असतात. पावसाळ्यात अनेक वेळा या पुलावरून पाणी वाहते. हा विचार करून नवीन पुलाचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.