राज्य सरकारने अटीही शिथिल केल्या ,परवाना दीड लाखांवरून ५० हजारांवर
मुंबईत फ्लिट टॅक्सीला चालना देण्यासाठी राज्य सरकारने फ्लिट टॅक्सीचे ७८५० परवाने काढून त्यातही शंभराहून अधिक परवाने महिला फ्लिट टॅक्सीसाठी निश्चित केले असले, तरी अद्याप या परवान्यांसाठी अर्जच आले नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे महिलांसाठी काम करणाऱ्या विविध संस्थांनी या प्रक्रियेत सहभागी व्हावे, यासाठी राज्य सरकारने परवान्यासाठीच्या अटी शिथिल करण्याचे धोरण अवलंबले आहे.
रात्री-अपरात्री प्रवास करणाऱ्या महिलांना सुरक्षित प्रवासाची हमी मिळावी आणि महिला वाहनचालकांना रोजगारही मिळावा, या दुहेरी हेतूने राज्य सरकारने महिला फ्लिट टॅक्सीला प्राधान्य देण्याचे ठरवले. मात्र त्यासाठी प्रस्तावच आले नसल्याने आता राज्य सरकार या परवान्यासाठीच्या अटी शिथिल करणार आहे. याआधी एका टॅक्सीचा परवाना मिळवण्यासाठी दीड लाख रुपये मोजावे लागत होते. मात्र नव्या नियमानुसार महिलांसाठी ही रक्कम ५० हजार एवढी कमी करण्यात आली आहे. तसेच परवान्याचा अर्ज करणाऱ्या कंपनीने दोन कोटींऐवजी ५० लाख रुपयांचे परवाने घ्यावेत, असेही नव्या नियमांत म्हटले आहे.
राज्य सरकारने फ्लिट टॅक्सीसाठीच्या ७८५० परवान्यांपैकी १०० परवाने महिलांच्या गटांसाठी राखीव ठेवले होते. महिला उद्योजकांनी पुढे येऊन या संधीचा लाभ घ्यावा, असा हेतू त्यामागे आहे. ही सेवा प्रवासी तसेच चालक महिलांसाठी लाभदायक ठरणार आहे. मात्र या प्रस्तावातील परवाने मिळवण्यामागच्या अटी थोडय़ा शिथिल करून महिलांनी पुढे यावे, यासाठी चालना देत आहोत, असे प्रादेशिक परिवहन विभागाचे प्रभारी परिवहन आयुक्त सतीश सहस्रबुद्धे यांनी स्पष्ट केले.
राज्य सरकारच्या या महिला फ्लिट टॅक्सीच्या परवाना प्रक्रियेसाठी ‘प्रियदर्शिनी फ्लिट कॅब’ ही एकमेव कंपनी पुढे सरसावली होती. मात्र इतर कंपन्यांनी फारसे स्वारस्य दाखवलेले नाही. परिवहन सूत्रांनुसार या कंपनीनेच परवान्याच्या अटी शिथिल करण्याची विनंती केली आहे. सध्याच्या घडीला प्रियदर्शिनी आणि वीरा या दोनच कंपन्या मुंबईत महिला फ्लिट कॅब सेवा पुरवत आहेत. मात्र या सेवाही विमानतळ परिसरातच मर्यादित आहेत. राज्य सरकारला या सेवेचा परीघ विस्तारायचा असल्याने सरकारने आता या अटी शिथिल करण्याचे धोरण अवलंबले आहे. या अटी शिथिल केल्यानंतर महिला फ्लिट टॅक्सी परवान्यांसाठी अधिकाधिक महिला गट पुढे सरसावतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.