एखादा गुन्हा घडला की ‘सायरन’ वाजवत येणारी पोलीस वाहने आणि लगेच गुन्हेगाराला पकडण्यासाठी होणारी धावपळ हे चित्रपटात पहावयास मिळणारे चित्र अनेकदा वास्तवातही दिसत असते. गुन्हेगारी घटना रोखण्यासाठी पोलीस प्रयत्न करत असले तरी कधीतरी हे प्रयत्न हद्दीच्या मुद्यावर अडून बसतात आणि दाद मागणाऱ्या तक्रारदारावर पायपीट करण्याची वेळ येते. सरकारवाडा आणि गंगापूर या पोलीस ठाण्यांच्या हद्दीच्या सीमारेषेवर वसलेल्या पाटील कॉलनीतील एक बंद घर चोरटय़ांनी फोडल्यानंतर काहिशी अशीच अनुभूती तक्रार नोंदविणाऱ्या घरमालकाच्या नातेवाईकांना आली.
शहरात चोरी, घरफोडीचे प्रकार दिवसागणीक वाढत आहेत. कॉलेज रोडवरील पाटील कॉलनी लेन क्रमांक तीनमध्ये साईबाबा मंदिरालगतच्या इमारतीतील बंद घर चोरटय़ांचे लक्ष्य ठरले. या घरातील सदस्य सहलीसाठी बाहेरगावी गेले होते. स्थानिकांनी त्याबाबत माहिती दिल्यावर संबंधित घरमालकाने आपल्या नातेवाईकांना तातडीने घटनास्थळी पाठविले. चोरटय़ांनी घरातून रोख रक्कम आणि दागिने असा सुमारे दोन लाखाचा ऐवज लंपास केल्याचे निदर्शनास आले. मग, नातेवाईकांनी तडक गंगापूर पोलीस ठाण्यात धाव घेतली. गंगापूर पोलीस ठाण्यात प्राथमिक तक्रार नोंदविण्यात आली. पोलीस कर्मचारी लगेच घटनास्थळी पोहोचले. घराची पाहणीही केली. परंतु, अखेरीस ही इमारत ज्या भागात आहे, ती गंगापूर पोलीस ठाण्याची हद्द नसल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी नातेवाईकांना सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास सांगितले. जवळपास दीड ते दोन तास धावपळ करूनही पुन्हा सरकारवाडा पोलीस ठाण्यात नातेवाईकांना तक्रार देण्यासाठी धाव घ्यावी लागली. या ठिकाणी सर्व घटनाक्रम पुन्हा कथन करावा लागला. तक्रारीचे सोपस्कार पार पडेपर्यंत तासभर गेला. मग पुन्हा नव्याने या पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यानंतर ठसे तज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आले. जे नातेवाईक तक्रार देण्यासाठी आले होते, त्यांना त्याच दिवशी बाहेरगावी जायचे होते. परंतु, पोलीस ठाण्याच्या हद्दीच्या मुद्यावरून निर्माण झालेल्या तिढय़ाने त्यांना दोन वेळा तक्रार नोंदविण्यासाठी कसरत करावी लागली. जशी तक्रारदाराची धावपळ झाली, तशीच वेगवेगळ्या पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी कसरत केली.