मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये असलेल्या गगगचुंबी इमारतींमधील आगप्रतिबंधक यंत्रणा व्यवस्थित आहे की नाही, त्याची झाडाझडती महापालिका आणि अग्मिशमन दलाकडून करण्यात आली होती. गेल्या काही महिन्यांपासून शासकीय इमारतींचीही तपासणी सुरू झाली असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.
गेल्या काही दिवसांत मुंबईत गगनचुंबी इमारतींना आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यापैकी बहुतांश इमारती खासगी आहेत. या आगीनंतर आमच्या इमारतींची जशी तपासणी केली जाते, तशी शासकीय इमारतींची केली जाते का, शासकीय इमारतींमधून आग प्रतिबंधक यंत्रणा आणि तिची देखभाल व्यवस्थित होते का, अशी चर्चा सुरू झाली होती. विशेषत: मंत्रालय आगीनंतर हे वास्तव समोर आले होते.
 मंत्रालयाच्या आगीनंतर अग्निशमन दलाने इमारतीची तपासणी केली होती तेव्हा अनेक त्रुटी समोर आल्या होत्या. आगीनंतर मंत्रालयाच्या दुरस्तीचे काम हाती घेण्यात आले तेव्हाही अग्निशमन दलाकडून सूचना करण्यात आल्या होत्या, अशी माहिती या सूत्रांनी दिली.
अनेक इमारतींमध्ये आगप्रतिबंधक नियम धाब्यावर बसविल्याचे दिसून आले होते. त्यावेळी अशा प्रकारची यंत्रणा न बसवलेल्या इमारतींना नोटिसा बजाविण्यात आल्या होत्या. त्या पाश्र्वभूमीवर आता शासकीय इमारतींची तपासणी मोहिम सुरू करण्यात आली आहे.