मुंबईत विशेषत: झोपडपट्टी परिसरात छेडछाड, विनयभंगाच्या घटना वारंवार घडत असतात, परंतु भीतिपोटी अशा घटनांची नोंदच पोलीस ठाण्यात होत नसल्यामुळे संबंधितांचे फावते. या घटनांविरोधात कारवाई होत नसल्यामुळे अशा व्यक्तींची भीड चेपते. परिणामी बलात्कारासारख्या घटनांपर्यंत त्यांची मजल जाऊ शकते. हे टाळण्यासाठी अशा व्यक्तींना हुडकून काढून प्रतिबंधात्मक कारवाई व्हावी, या हेतूने पोलिसांनी परिसरातील गृहिणींची मदत घेण्याचे ठरविले आहे. अशा पद्धतीचा प्रयोग सध्या अँटॉप हिल आणि वडाळा टी टी पोलीस ठाण्यात सुरू करण्यात आला असून त्याला चांगला प्रतिसाद मिळाल्याचा दावा पोलीस सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) देवेने भारती यांनी केला आहे.
लैंगिक अत्याचाराच्या घटनांना आळा बसावा यासाठी पोलिसांनी साध्या वेशात गस्त वाढविली होती. परंतु अपुऱ्या मनुष्यबळामुळे पोलिसांना सर्वत्र पोहोचता येत नाही. तसेच झोपडपट्टी परिसरातील गल्ल्यांमध्ये पोहोचणेही बऱ्याच वेळा पोलिसांना शक्य होत नाही. त्यामुळे या झोपडपट्टय़ांमध्ये राहणाऱ्या गृहिणींनाच पोलिसांचे कान व डोळे केले तर त्याचा निश्चितच फायदा होईल, असे वाटल्यानेच ही योजना सध्या प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आल्याचेही भारती यांनी सांगितले.
परिसरातील गृहिणींनाच ‘गुप्तचरा’ची भूमिका बजावण्याचे आवाहन गुप्तपणे करण्यात आले आहे. महिला पोलीस घरोघरी जाऊन अशा गृहिणींशी गप्पागोष्टी करीत त्यांनी कशा पद्धतीने पोलिसांना मदत करायला हवी, हे समजून सांगत आहेत. विशेष म्हणजे अनेक गृहिणींकडून त्यास चांगला प्रतिसाद मिळाला. संबंधित गृहिणी या पोलिसांच्या डिटेक्टिव्ह असल्याची कल्पना येऊ नये, यासाठी विशेष काळजी घेण्यात येत आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास संपूर्ण मुंबईत त्याची अंमलबजावणी करण्याचे निश्चित केले जाणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. या गृहिणींची नावे गुप्त ठेवली जाणार आहेत. या गृहिणींशी संबंधित महिला शिपाई संपर्कात असेल. याशिवाय या गृहिणींना थेट वरिष्ठ निरीक्षक, साहायक आयुक्त वा उपायुक्तांशीही संपर्क साधता यावा यासाठी वैयक्तिक मोबाइल क्रमांक पुरविण्यात आले आहेत.

वडाळा टीटी आणि अँटॉप हिल परिसरात गेल्या काही कालावधीत लैंगिक अत्याचाराच्या बऱ्याच घटनांची नोंद झाली. त्यामुळे ही पोलीस ठाणी तूर्तास निवडण्यात आली आहेत. या प्रत्येक परिसरातील पाच गृहिणींची यासाठी निवड करण्यात आली आहे. छेडछाड करणारे ते तरुणींवर पाळत ठेवणारे तसेच लैंगिक अत्याचाराची पाश्र्वभूमी असलेले मद्यपि आणि अमली पदार्थाची तस्करी आदींवर कशी पाळत ठेवायची, याचे विशेष प्रशिक्षण त्यांना देण्यात आले आहे. या गृहिणींनी दैनंदिन कामकाज सांभाळताना डिटेक्टिव्हची भूमिका पार पाडावी, अशी अपेक्षा आहे आणि त्यास या गृहिणींनीही प्रतिसाद दिला आहे
देवेन भारती,
सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था)