स्वाइन फ्लूचा वर्षांतील दुसरा बळा गेल्यानंतर निद्रीस्त आरोग्य विभागाला खडबडून जाग आली आहे. स्वाइन फ्लू सदृश्य रुग्णांसाठी जिल्हा शासकीय व ग्रामीण रुग्णालये येथे स्वतंत्र कक्षाची निर्मिती करण्यात आली. या आजाराचा मुकाबला करण्यासाठी प्रयत्न सुरू असतांना आरोग्य विभागाने प्रचार, प्रबोधन यावर भर दिला आहे. तथापि, रुग्णांवर उपचार करताना औषधांचा तुटवडा जाणवत आहे.
साधारणत: तीन ते चार वर्षांनंतर पावसाळ्यात हंगामात स्वाइन फ्लूने डोके वर काढले आहे.
येवला तालुक्यातील बाजीराव चव्हाण यांचा दोन दिवसांपूर्वी खासगी रुग्णालयात स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झाला. या घटनेनंतर आरोग्य विभागाची यंत्रणा जागी झाली. जिल्ह्यातील १०३ प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच २४ ग्रामीण रुग्णालयाच्या बाह्य़ रुग्ण विभागात स्वाइन सदृश्य रुग्णांची तपासणी केली जात आहे. जिल्ह्यात चार ठिकाणी स्वतंत्र कक्षाची निर्मिती करण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुशील वाकचौरे यांनी दिली.
शाळा, महाविद्यालयात तसेच ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावोगावी स्वाइन फ्लू आजाराची माहिती, त्या विषयी प्रबोधनावर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. हा आजार बळाविण्यासाठी सध्या पोषक वातावरण आहे. यामुळे नागरिकांनी सावधगिरी म्हणून गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, असेही त्यांनी सूचित केले. जून ते सप्टेंबर या कालावधीत स्वाइन फ्लू सदृश्य १८ रुग्ण आढळले असून त्यांची थुंकीचे नमुने पुणे येथील राष्ट्रीय विषाणूजन्य प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले. त्यातील ३ रुग्णांना स्वाईन फ्लूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. उपचाराअंती त्यांची प्रकृती सुधारली असून ते घरी परतल्याचे जिल्हा शल्य चिक्तिसक डॉ. एकनाथ माले यांनी सांगितले.
दरम्यान, रुग्णांसाठी जिल्हा रुग्णालयाच्या मागील बाजूस स्वतंत्र कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे. या ठिकाणी तीन खोल्या कक्षासाठी राखीव आहेत. त्यात रुग्णांनी कुठला आहार घ्यावा, त्यांची दिनचर्या कशी असावी याबाबत माहितीफलक लावण्यात आले आहेत. तसेच रुग्णांच्या सोयीसाठी ऑक्सिजन, व्हेंटीलेटरसह एक वैद्यकीय अधिकारी, एक परीक्षक
आणि ५ परिचारीका असे पथक तयार करण्यात आले आहे. स्वाइन फ्लूचा सामना करण्यासाठी आरोग्य विभागाने तयारी केली असली तरी अपुरा अथवा कालबाह्य़ औषधसाठा या समस्येचा सामना करावा लागत आहे. मागील दोन ते तीन वर्षांत स्वाइन फ्लूचा प्रभावी कमी झाल्यामुळे त्याकडे गांभीर्याने पाहिले गेले नाही. परिणामी, या रुग्णांना द्याव्या लागणाऱ्या ‘टॅमी फ्लू’च्या गोळ्यांची मुदत संपुष्टात आली आहे. राज्यपातळीवर तसेच केंद्र पातळीवर सध्या औषध खरेदीसाठी निविदा प्रक्रिया सुरू आहे. यामुळे रुग्णालयाला खासगी सेवेतून औषधे खरेदी करण्याची सवलत देण्यात आली आहे.
स्वाइन फ्लू कक्षाचे आरोग्य धोक्यात
जिल्हा रुग्णालयाच्या आवारातील जुन्या औषध विभाग कक्षात स्वतंत्र अशा स्वाइन फ्लू कक्षाची उभारणी करण्यात आली आहे. यासाठी तीन खोल्या राखीव आहेत. मात्र त्या इमारतीतील प्रसाधनगृहाच्या खोल्यांमध्ये तयार करण्यात आल्या आहेत. बाहेरील आवारात नादुरूस्त फलक, स्ट्रेचर, काही भंगार, वाढलेले गवत पसरलेले आहे. यामुळे परिसरात डासांचे साम्राज्य असून कक्ष तसेच रुग्णांचे आरोग्य धोक्यात आहे.डेंग्युच्या रुग्णांमध्ये वाढ
सततच्या पावसामुळे डेंग्युंच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. जून ते सप्टेंबर या चार महिन्याच्या कालावधीत जिल्ह्यात ५३१ हून अधिक डेंग्युसदृश्य रुग्ण आढळले आहेत. त्यातील १४४ नागरिकांना डेंग्यु झाल्याचे निष्पन्न झाले. यात शहरी व ग्रामीण भागात एकूण ५ जणांचा डेंग्युमुळे मृत्यू झाला आहे.