शिक्षकांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या पगाराची अंतरिम वाढ थकविल्याने शाळा व्यवस्थापन आणि कर्मचाऱ्यांमध्ये अनेक दिवसांपासून संघर्ष सुरू आहे. या संघर्षांत पालक शिक्षकांच्या बाजूने उभे राहिल्याने या संघर्षांची धार अधिक तीव्र झाली आहे. मात्र शाळा व्यवस्थापनाने आश्वासनाशिवाय कोणतीही ठोस भूमिका न घेतल्याने अखेर गुरुवारपासून पालक आणि शिक्षकांनी साखळी उपोषण करण्याची घोषणा केली होती. यातच शाळा व्यवस्थापनाने आंदोलनकर्त्यां १२ शिक्षकांवर निलंबनाची कारवाई केल्याने, उपोषणासाठी जमा झालेल्या पालकांचा उद्रेक अनावर झाल्याने संतप्त पालकांनी त्या ठिकाणी नेमण्यात आलेल्या खासगी रक्षकांना (बाऊन्सर्स) चोप देत प्रशासनाला धारेवर धरले होते.
दिवाळीच्या सुट्टीनंतर शाळेच्या पहिल्या दिवसापासूनच सुरू झालेले शिक्षकांचे बंड अद्यापही शमलेले नाही. शालेय व्यवस्थापन आपल्या भूमिकेवर ठाम असून शिक्षकांनीदेखील शालेय प्रशासनाच्या विरोधात दंड थोपटले आहे. त्यातच पालक संघटनादेखील शिक्षकांच्या मदतीला धावले आहेत. त्यामुळे आंदोलन आणि अनेक बैठका यामुळे ऐरोलीतील श्रीराम विद्यालय चांगलेच तापले आहे. श्रीराम विद्यालयाच्या इंग्रजी माध्यमाच्या सेकंडरी विभागात ४४ शिक्षक विद्यादानाचे काम करतात. शाळेच्या स्थापनेपासून आजपर्यंत या शाळेत हे शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवतात. शालेय प्रशासनाने या शिक्षकांना शालेय शिक्षक कर्मचारी वेतन नियमानुसार किमान पगार देणे आणि वार्षिक अंतरिम वाढ देणे अनिवार्य आहे. मात्र असे असताना शालेय प्रशासनाने शिक्षकांच्या पगारातून पीएफ व इतर रक्कम वजा करत पगार दिला जातो. वर्षांकाठी शिक्षकांना अपेक्षित असणाऱ्या वेतनप्रणालीनुसार पगारवाढ देण्याऐवजी केवळ ३०० ते ५०० रुपये कर्मचाऱ्यांना वाढ देऊन शालेय व्यवस्थापन शिक्षकांच्या तोंडाला पाने पुसत आहे. तसेच सुट्टय़ांची रक्कमदेखील दिली जात नाही. इतकेच नाही, तर येथे कार्यरत असणाऱ्या लिपिक आणि प्रयोगशाळेचे शिक्षक व इतर शिक्षकांनादेखील जुन्या नियमावलीनुसार पगार दिला जातो. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या शिक्षकांनी आणि शिक्षकेतर  कर्मचाऱ्यांनी अनेकदा विचारणा केली असता व्यवस्थापनाने केवळ आश्वासनावर त्यांची बोळवण केली. मागील पंधरा दिवसांचा कालावधी उलटूनदेखील व्यवस्थापनाने शिक्षकांबाबत सकारात्मक भूमिका न घेतल्याने त्यातच शालेय विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याने या प्रश्नी तोडगा निघावा याकरिता शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे पालक संघटनेने धाव घेतली आहे.
२१ नोव्हेंबर रोजी श्रीराम विद्यालय पालक संघटना आणि शालेय शिक्षक- विद्यार्थ्यांनी एक रॅली काढली. या वेळी शिक्षक, विद्यार्थी व पालकांनी रॅलीत श्रीराम शाळेच्या प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली. तरी शालेय प्रशासनाने याची दखल घेतली नसल्याने गुरुवारपासून शिक्षक संघटना व पालक संघटनांनी साखळी उपोषणाची घोषणा केली होती.  त्यामुळे शाळा प्रशासनाने आंदोलनकर्त्यां १२ शिक्षकांवर निलंबनाची कारवाई केली. तसेच मुख्याध्यापक त्यागराज चेटीआर यांनादेखील दुसऱ्या शाळेत शिक्षक म्हणून रुजू व्हा अन्यथा राजीनामा द्या, असा दम प्रशासनाने दिला असल्याचा आरोप पालकांनी केला आहे. तसेच पालक व शिक्षक संघटनांचा विरोध मोडून काढण्यासाठी शाळेभोवती खासगी सुरक्षारक्षकांचे कडे निर्माण करण्यात आले होते. हे खासगी सुरक्षारक्षक शिक्षकांस शाळेच्या प्रवेशद्वाराच्या आत येण्यास मज्जाव करत होते. यामुळे उपोषणासाठी जमलेल्या पालकांचा संताप अनावर झाला होता. या वेळी पालकांनी शालेय प्रशासनाला धारेवर धरत खासगी सुरक्षारक्षकाला मारहाण केली.