मुहूर्ताविना थांबलेली लग्नसराई सध्या जोमात सुरू असून शहरात आणि ग्रामीण भागात मोठय़ा प्रमाणात विवाह समारंभ होत आहेत. या विवाह समारंभासाठी गावातील वऱ्हाडी न्यावे लागत असल्याने एस.टी.सारखा स्वस्त आणि सुरक्षित पर्याय उपलब्ध असतानाही आणि आजघडीपर्यंत वऱ्हाड नेणाऱ्या खासगी वाहनांचे असंख्य अपघात झाल्याचे ऐकिवात असतानाही गावोगावी वऱ्हाडासाठी खासगी वाहनांनाच पसंती दिली जात असल्याचे चित्र आहे. लग्नसराईमुळे खासगी वाहतूकदारांचा व्यवसाय तेजीत आहे.
लग्न हा आयुष्यातील सर्वात मोठा आनंदाचा क्षण. या क्षणाला एखादी दुर्घटना घडली तर सगळा रसभंग होतो. गावानुसार आणि धर्मानुसार प्रत्येकाच्या लग्नाच्या प्रथा वेगळ्या आहेत. ग्रामीण भागात तर लग्न हा सोहळा उत्सवाप्रमाणे साजरा होतो. ग्रामीण भागांतील बहुतेक लग्न ही प्रथेप्रमाणे मुलीच्या किंवा मुलाच्या घरातच होतात. गावात कुणाचेही लग्न असो, प्रत्येक लग्नाला संपूर्ण गावाचे वऱ्हाड घेऊन जाण्याची प्रथा आहे. याचा खर्च अर्थातच लग्नघरावर असतो. संपूर्ण गाव जमून एकाच गाडीतून जाण्याची प्रथा आहे. यासाठी ग्रामीण भागात ट्रक किंवा टेंपो नेण्याची पद्धत आहे. ट्रक, ऑटो किंवा मेटॅडोरमध्ये माणसे कोंबून लग्नासाठी नेली जातात. ग्रामीण भागात तर एका ऑटोमध्ये १५ ते २० प्रवासी बसवून नेले जातात. त्यातील काही तर ऑटोमध्ये लोंबकळत प्रवास करीत असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून येते. जिल्ह्य़ात खासही वाहने अंतर पाहून  ५० ते २०० रुपयापर्यंत भाडे आकारून एकावेळी दहा ते बारा प्रवासी घेऊन जात असतात.
सक्करदरा भागातून मोठय़ा प्रमाणात खासगी वाहने जातात. त्यांना एक किंवा दोन प्रवासी घेऊन जाणे परवडत नसल्यामुळे ट्रॅक्स, सुमो किंवा जीपमध्ये बसतील तेवढे प्रवासी ते घेऊन जातात. त्यासाठी बसच्या भाडय़ापेक्षा १० ते २० रुपये जास्त घेत असतात. त्यामुळे लग्नसराईच्या निमित्ताने गावागावांतील खासगी वाहनचालकांना मोठी तेजी असते. मात्र हीच खासगी वाहने अपघाताला कारणीभूत ठरून असंख्य जण प्राणाला मुकले असल्याच्या घटना विदर्भातील विविध जिल्ह्य़ांत आजवर घडल्या आहेत. माणसांचा भार न पेलल्याने वाहने उलटतात. सुसाट वेगात जाऊन अपघात घडून आजवर असंख्य वऱ्हाडी जायबंदी झाले आहेत, तर असंख्य जणांना प्राण गमवावे लागले आहेत. लग्नाला जाताना वाहनातच ताशे, बेंजो, डीजे असे प्रकार लावले जातात. परिणामी, या वाद्यांच्या तालावर बऱ्याच वेळा चालकाचे लक्ष विचलीत होते आणि अपघात घडतो. त्यातच वाहनात अपेक्षेपेक्षा जास्त माणसे भरलेली असतात. ग्रामीण भागांतील प्रवाशांची वाहतूक करण्यासाठी एस. टी. महामंडळासारखा स्वस्त आणि सुरक्षित पर्याय उपलब्ध आहे. सीट आणि अंतरानुसार गणित करून एस. टी.चे पैसे आकारले जातात. विवाह किंवा मंगलमय समारंभासाठी प्रासंगिक करार म्हणून एस.टी. महामंडळाकडून बसेस दिल्या जात असून २०० किमीपर्यंत बस भाडे साधारणत: ५ ते १० हजार रुपये आणि २०० किमीच्यावर बस जात असेल तर १४ ते १५ हजार रुपये पडतात. ही सोय १२ तासासाठी करून देण्यात आली. शिवाय ग्रामीण भागात प्रत्येक गावात बसेस जातात. शिवाय नागपूरवरून दर एक किंवा दोन तासांनी जिल्ह्य़ातील विविध भागात बसेस जात असतात. खासगी गाडय़ाच्या तुलनेत बसच्या भाडय़ामध्ये फारसा फरक नसल्यामुळे नागरिकांनी अपघाताला निमंत्रण न देता एस.टी. बसने प्रवास करावा, असे आवाहन विभाग नियंत्रक अशोक तारोडे यांनी केले.