समकालीन प्रकाशन आणि एचडीएफसी होम लोन्स यांच्या वतीने १ ते ३ ऑगस्ट या कालावधीत येथे ‘उत्सव समकालीन साहित्याचा’ हा तीन दिवसांचा साहित्य उत्सव आयोजित करण्यात आला असून समकालीन प्रकाशनला ऑगस्टमध्ये आठ वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असल्याची माहिती समकालीन प्रकाशनचे आनंद अवधानी, शाम देशपांडे आणि सुहास कुलकर्णी यांनी दिली आहे.
तीन दिवसांच्या या उत्सवात अनिल अवचट यांचे ‘माझी चित्तर कथा’, तुषार नातू यांचे ‘नशायात्रा’ आणि अभिमन्यू सूर्यवंशी यांचे ‘शेतकरी जेव्हा जागा होतो’ या तीन पुस्तकांचे प्रकाशन होणार आहे. १ ऑगस्ट रोजी साहित्य उत्सवाचे उद्घाटन माजी मंत्री विनायकदादा पाटील यांच्या हस्ते होणार आहे. प्रसिद्ध लेखक अनिल अवचट यांचे स्वत:च्या चित्रकलेचा
प्रवास सांगणारे सचित्र पुस्तक ‘माझी चित्तर कथा’चे प्रकाशन विनायकदादा पाटील यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर अवचट यांच्याशी गप्पांचा कार्यक्रम होणार आहे. हा कार्यक्रम कुसुमाग्रज स्मारकात सायंकाळी
६ वाजता होणार आहे.दुसऱ्या दिवशी सायंकाळी ६ वाजता तुषार नातू यांच्या ‘नशायात्रा’ या पुस्तकाचे प्रकाशन अच्युत गोडबोले यांच्या हस्ते होईल. व्यसनांच्या दुष्टचक्रात अडकून स्वत:च्या आयुष्याची ससेहोलपट करून घेतलेल्या आणि जिद्दीने त्यातून बाहेर पडलेल्या माणसांचे प्रांजळ आत्मकथन असलेल्या या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी अनिल अवचट असतील. ३ ऑगस्ट रोजी स्वतंत्र भारतातील पहिला यशस्वी शेतकरी लढा उभारणाऱ्या पुंजाबाबा गोवर्धने या शेतकरी योद्धय़ाची संघर्षगाथा मांडणारे अभिमन्यू सूर्यवंशी लिखित ‘शेतकरी जेव्हा जागा होतो’ या पुस्तकाचे प्रकाशन शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांच्या हस्ते होणार आहे. हा कार्यक्रम सायंकाळी चार वाजता गंगापूररोडवरील कर्मवीर बाबुराव ठाकरे अभियांत्रिकी महावद्यिालयाच्या सभागृहात होणार आहे. या उत्सवानिमित्त समकालीन प्रकाशनच्या पुस्तकांचे विशेष प्रदर्शनही होणार आहे.