अस्ताव्यस्तपणे पडलेले साहित्य.. चकचकीत फरशीवर पसरलेले धुळीचे साम्राज्य.. कुठे सिमेंटच्या गोण्या तर कुठे जुनाट काढून ठेवलेल्या खिडक्या.. फर्निचरचे काम सुरू असल्याने आणि काही ठिकाणी फरशींचे बॉक्स ठेवले गेल्यामुळे बसण्यासाठी कुठेही फारशी जागा नाही.. बांधकाम साहित्याच्या जंजाळात डोकावणारे भगवे व निळे झेंडे.. कार्यालय मंत्री आणि काही कामगार यांचा अपवादवगळता पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा कुठे मागमूसही नाही.. मागील बाजूच्या खुल्या सभागृहात महायुतीच्या उमेदवाराचा फलक आणि त्यालगत भाजपच्या इतर नेत्यांचे छायाचित्रांसह वेगवेगळे संदेश देणारे फलक..
एन. डी. पटेल रस्त्यावरील वसंतस्मृती या भाजपच्या कार्यालयात गुरुवारी दिसलेले हे चित्र. नाशिक लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील हरिश्चंद्र चव्हाण यांच्या प्रचाराची जबाबदारी या कार्यालयावर आहे. कार्यालयाच्या मागील सभागृहातील फलक अन् स्वागत कक्षाच्या बाहेर पडलेली काही प्रचारपत्रकांचे गठ्ठेवगळता कुठेही प्रचार यंत्रणा राबविली जात असल्याचा लवलेश दिसत नाही. कार्यालयाच्या नूतनीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याने हे चित्र निर्माण झाल्याचे लक्षात येते. पदाधिकारी व कार्यकर्ते अधूनमधून हजेरी लावत असल्याचे सांगितले जात असले तरी सकाळी कार्यालय व्यवस्थापकाची धुरा सांभाळणारे अरुण शेंदुर्णीकरवगळता कोणीही नव्हते. सकाळी साडे नऊ वाजता कार्यालय उघडण्यात आले. वर्तमानपत्रांचे वाचन झाल्यावर त्यांनी काही महत्त्वाच्या बातम्यांवर नोंद केली. मग, शेंदुर्णीकरांचे संपर्क अभियान सुरू झाले. शिवसेना कार्यालयातून दूरध्वनीद्वारे आजच्या कार्यक्रमांच्या माहितीचे संकलन सुरू झाले.
‘जय महाराष्ट्र.. काय आदेश आहे साहेब..’ असे करडय़ा आवाजातील हे संभाषण. कार्यालयातील वहीवर मग ते आदेश टिपण्यास सुरुवात झाली. बांदेकर यांचा रोड शो. अशोकस्तंभ येथून सायंकाळी पाच वाजता सुरुवात. हा दूरध्वनी होत नाही तोच, कार्यालयात साफसफाईचे काम करणारी महिला दाखल झाली. आपल्या पैशांचे काय झाले, अशी विचारणा तिने केली. प्रभुभाऊंकडून ते काम होईल असे सांगत शेंदुर्णीकर दुसऱ्या कामाला लागले. त्यांचा भ्रमणध्वनी अधूनमधून वाजत असतो. पण, पलीकडील व्यक्तीला नंतर बोलू, असे ते सांगतात. दैनंदिन प्रचारफेरी, रोड शो वा तत्सम सर्व कार्यक्रमांची माहिती दूरध्वनीवरून भाजपच्या पदाधिकाऱ्यांना दिली जाते. पुढे, त्यांच्यामार्फत मंडलनिहाय पदाधिकारी व कार्यकर्त्यांना लघुसंदेश पाठविले जातात, अशी माहिती शेंदुर्णीकर देतात. सध्या बहुतांश काम दूरध्वनीवरून सुरू आहे. अध्यक्ष, सरचिटणीस वा अन्य पदाधिकारी भ्रमणध्वनीवर परस्परांच्या संपर्कात असतात. प्रचारातून जेव्हा वेळ मिळेल तेव्हा कार्यालयातून येऊन आढावा घेतला जातो. प्रचारपत्रके वा साहित्य कोणाला मिळाले नाही, याची खातरजमा केली जाते. जिथे कमतरता असेल तिथे पदाधिकाऱ्यांमार्फत ते पाठविले जाते. नाशिकच्या शिवसेना उमेदवारासाठी भाजपने स्वतंत्रपणे प्रचारपत्रकांची छपाई करून घेतली आहे. त्यांच्यासह इतर पत्रकांचे काही गठ्ठे स्वागत कक्षाच्या बाहेर दृष्टिपथास पडतात.
भाजपची मंडलनिहाय यंत्रणा प्रचारात सक्रिय झाल्याचे शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी भ्रमणध्वनीवरून सांगितले. पंचवटी मंडलातील पदाधिकारी व कार्यकर्ते सकाळी म्हसरुळ परिसरात निघालेल्या प्रचार फेरीत सहभागी झाल्याचे त्यांनी सांगितले. दुसरीकडे भाजपच्या कार्यालयात नवीन स्वागतकक्ष व पदाधिकाऱ्यांची दालने बनविण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे सर्वत्र धूळ, काही जुने काढून ठेवलेले सामान, फरशींचे बॉक्स व प्लायवूडच्या साहित्याची ठिकठिकाणी रेलचेल दिसते. स्वागतकक्षातील दोन ते तीन खुच्र्यावर धुळीचे साम्राज्य आहे. त्याच ठिकाणी एका कोपऱ्यात असणारे भगवे व निळे झेंडे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची प्रतीक्षा करताना दिसतात..