पर्यावरणाच्या इतिहासात महत्त्वाचा टप्पा ठरणाऱ्या येथील वन महोत्सवात सहभागासाठी राज्याच्या इतर भागातूनही प्रस्ताव येत असून, पुणेकरांनी १० हजार झाडे देण्याचा घेतलेला निर्णय हा वन महोत्सवाला बळ देणारा आहे, अशी माहिती पर्यावरणमित्र शेखर गायकवाड यांनी दिली.
सातपूर येथील फाशीच्या डोंगरालगत ४० एकरावर ५ जून रोजी वन महोत्सव होणार असून यावेळी पर्यावरण जत्रादेखील आयोजित करण्यात आली आहे. आपलं पर्यावरण संस्था आणि वन खात्याच्या वतीने होत असलेल्या या महोत्सवात १० हजार नागरिक एकाच वेळी १० हजार झाडे लावणार आहेत. महोत्सवाच्या तयारीसाठी फाशीच्या डोंगरालगत झालेल्या बैठकीत डॉ. गायकवाड यांनी ही माहिती दिली. शहरातील सर्व क्षेत्रातील संस्था मोठय़ा प्रमाणात महोत्सवात सहभागी होत आहेत. याशिवाय मुंबई, कल्याण, अहमदनगर, धुळे, ठाणे, जळगाव येथील पर्यावरणप्रेमींकडून विचारणा होत आहे. महोत्सवात लागणारी झाडे, कुंपण, पाणीपुरवठा अशी सर्व खर्चिक कामे लोकांच्याच सहभागातून केली जाणार आहेत. नाशिककरांनी फक्त वन महोत्सव व पर्यावरण जत्रेत सहभागी होऊन या चळवळीला बळ देण्याचे आवाहन गायकवाड यांनी केले.
महोत्सवासाठी स्थापन करण्यात आलेल्या विविध समित्यांनी आपला आढावा यावेळी सादर केला. महोत्सवात लावलेले प्रत्येक झाड जगवून तेथे अभयारण्य उभारण्याचा संकल्प पर्यावरणप्रेमींनी केला आहे. यावेळी निसर्गप्रेमी मीनल नाईक आणि आनंद नाईक यांनी महोत्सवासाठी चिलार झाडाच्या ३० किलो बिया सुपूर्द केल्या. तसेच डॉ. विनोद गुजराथी, ऐश्वर्या गुजराथी यांनी ११ हजारांचा धनादेश यावेळी गायकवाड यांच्याकडे दिला.