कामगारांच्या प्रश्नांसाठी प्रशासनाशी झगडणाऱ्या रेल्वे कामगार संघटनांनी सध्या प्रवाशांच्या मात्र नाकी नऊ आणले आहेत. काही रेल्वे कामगार संघटनांनी आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी गेल्या वर्षभरात सातत्याने काम बंद आंदोलन चालवले असून त्यांच्या या‘दबंगगिरी’मुळे प्रवाशांचे मात्र हाल होत आहेत. विशेष म्हणजे या संघटना व कर्मचाऱ्यांवर प्रशासनही सातत्याने नमते घेत आहे. यंदा गणेशोत्सवात पहिल्यांदाच कोकणात डबलडेकर वातानुकुलित गाडी सोडण्यात आली. या गाडीच्या पहिल्याच प्रवासात रोहा स्थानकात मध्य रेल्वेच्या इंजिन चालकाने गाडी पुढे नेण्यास नकार दिला. कोकण रेल्वे आणि मध्य रेल्वे यांच्यातील परस्पर सामंजस्याच्या अभावामुळे झालेल्या गोंधळाचा फटका प्रवाशांना बसला. या इंजिन चालकावर प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला खरा, मात्र अनेक
कर्मचारी संघटनांपैकी एका संघटनेने दबाव आणताच ही कारवाई मागे घेण्याचा‘दिलदारपणा’ही प्रशासनाने दाखवला. रेल्वेमध्ये कामगारांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. मोटरमन आणि गार्ड यांच्या विश्रांती कक्षाचा प्रश्नही ऐरणीवर आहे. त्याशिवाय रेल्वेरुळांवर अपुऱ्या संख्येमुळे अपघातात मृत्युमुखी पडणारे गँगमन, तिकीट तपासनीसांची कमी संख्या, कर्मचाऱ्यांवरील अतिरिक्त भार अशा अनेक समस्यांमुळे रेल्वे कर्मचारी कमालीचे त्रस्त आहेत. या समस्यांची जाणीव नॅशनल रेल्वे मजदूर युनियन (एनआरएमयू), वेस्टर्न रेल्वे मजदूर युनियन (डब्लूआरएमयू), वेस्टर्न रेल्वे मजदूर संघ (डब्लूआरएमएस), सेंट्रल रेल्वे मजदूर संघ (सीआरएमएस), भारतीय रेल्वे कामगार सेना, महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेना, एससी-एसटी रेल्वे कामगार संघ अशा अनेक संघटनांनी प्रशासनाला अनेकदा करून दिली आहे. यापैकी एनआरएमयू आणि सीआरएमएस या दोनच संघटना मान्यताप्राप्त आहेत.मात्र गेल्या वर्षभरात या संघटनांपैकी काही आक्रमक झाल्या असून त्यांनी प्रशासनाकडून जराही आगळीक होताच ‘काम बंद’चे हत्यार परजण्यास सुरुवात केली आहे. त्याचा परिणाम रेल्वेसेवेवर होतो. काही महिन्यांपूर्वी सेंट्रल रेल्वे मजदूर युनियनच्या काही मोटरमन कर्मचाऱ्यांनी आपल्या सहकाऱ्यावर रेल्वे प्रशासनाने कारवाई केल्याचा राग धरत ‘काम बंद’ केले होते. या वेळी या संघटनेने मोटरमन व गार्ड यांच्या कक्षाचे दरवाजे बंद करत इतरांनाही कामावर जाण्यास मज्जाव केला होता. संध्याकाळी साडेपाचसहाच्या सुमारास झालेले हे आंदोलन अर्धा-पाऊण तास चालले. पण ऐन गर्दीच्या वेळी लोकल वाहतुकीचे पार बारा वाजले. या कर्मचाऱ्यांवर काहीही कारवाई झाल्याचे ऐकिवात नाही. याबाबत एका वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्याला विचारले असता, रोहा प्रकरणात वास्तविक चालकाचा काही दोष नव्हता,असे त्याने स्पष्ट केले. त्याची डय़ुटी रोहा स्थानकात संपत असल्याने त्याने आपण गाडी पुढे नेणार नाही, असे सांगितले. मात्र तरीही आम्ही त्याच्यावर कारवाई
केल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले. रेल्वे कर्मचारी आमचेच आहेत. त्यांना पुरेशा सोयी नाहीत, हे आम्हालाही मान्य आहेत. मात्र निधी उपलब्ध होतोय, त्या प्रमाणात आम्ही सर्व सोयी त्यांना पुरवत आहोत. पण यापुढे आंदोलनाचे अस्त्र उगारल्यास आम्हाला कारवाई करण्यावाचून गत्यंतर नाही, असे या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

आंदोलन शक्यतो नकोच!
प्रवाशांच्या हालअपेष्टांना कोरणीभूत ठरणाऱ्या या आंदोलनांचे समर्थन क रता येणार नाही. कोमबंद आंदोलन करणे खूपच सोपे आहे. पण त्यासाठी कोरणही तसेच ठोस पाहिजे. केवळ स्वार्थासाठी कोणी असे आंदोलन करत असेल, तर त्यांना तातडीने शिक्षा व्हायला हवी. कामगारांचे प्रश्न चर्चेने सोडवण्याकडे आमचा कल आहे. मात्र रेल्वे प्रशासन निबर असून कोमगारांच्या सहनशक्तीचा स्फोट होण्याची वाट त्यांनी बघता कोमा नये.
वेणू नायर, महामंत्री (एनआरएमयू)