शासकीय विधी महाविद्यालयात सध्या एलएलएमची परीक्षा सुरू आहे. या परीक्षेदरम्यान शासकीय विधी महाविद्यालयात खोली क्रमांक १२मध्ये एका विद्यार्थिनीकडे पर्यवेक्षकांना कॉपी सापडली. मात्र तिच्यावर कोणतीही कारवाई न करता तिला परीक्षा देण्यास बसायला सांगितले. याचबरोबर उशिरा आलेल्या विद्यार्थिनीलाही परीक्षेस बसण्यास मुभा दिली. या विरोधात याच महाविद्यालयात परीक्षेस बसलेले अ‍ॅड. संतोष धोत्रे यांनी कुलगुरूंना पत्र लिहून लेखी तक्रार केली आहे.

गुरुवारी एलएलएमचा दुपारी ३ ते ६ या वेळेत पेपर – २ सुरू होता. परीक्षा सुरू झाल्यावर १५ मिनिटांच्या आत खोली क्रमांक १२मध्ये एका विद्यार्थिनीला कॉपी करताना पकडले. यानंतर ती विद्यार्थिनी स्वत:हून परीक्षा खोली सोडून निघून गेली. थोडय़ा वेळाने तेथील एक प्राध्यापक या विद्यार्थिनीला परीक्षा खोलीत घेऊन आले व तिला तोच पेपर लिहिण्यास दिला. कॉपी प्रकरणी तिच्यावर कोणतीही कारवाई केली नाही. इतकेच नव्हे तर एक विद्यार्थिनी परीक्षेला तब्बल पाऊण तास उशिरा आली तरी तिला परीक्षेस बसावयास दिल्याचे धोत्रे यांनी कुलगुरूंना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे.
या संदर्भात महाविद्यालयीन प्रशासनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही. दरम्यान हे पत्र अद्याप आमच्यापर्यंत आले नसून ते आल्यावर त्याबाबत संपूर्ण चौकशी करू असे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. नरेशचंद्र यांनी स्पष्ट केले आहे.