मुंबई शहर महिलांसाठी सुरक्षित असल्याचे वारंवार सांगितले जात असले तरी गेल्या काही वर्षांतील घटनांमुळे हा गरसमज तर नाही ना, अशी शंका घेण्याची परिस्थिती उद्भवली आहे. शहरातील शेअर टॅक्सी किंवा रिक्षामधून पुरुषांसह एकटय़ादुकटय़ा महिलेला प्रवास करताना मागच्या आसनांवर पुरुष प्रवाशांच्या शेजारी बसावे लागल्यास त्यांची कुचंबणा होते. नेमकी हीच कुचंबणा टाळण्यासाठी आणि टॅक्सी प्रवासातही महिलांची सुरक्षा जपण्यासाठी परिवहन विभागाने नवीन आदेश काढला आहे. या आदेशानुसार शेअर टॅक्सींमधील चालकाच्या शेजारचे आसन महिलांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहे. ३१ जानेवारी रोजी काढलेल्या या आदेशाची अंमलबजावणी सुरू झाली आहे.

शेअर टॅक्सीमध्ये तीन पुरुष प्रवाशांसह एखाद्या महिला प्रवाशाला प्रवास करावा लागला, तर अनेकदा पुरुष प्रवासी स्वत:हून महिला प्रवाशाला चालकाच्या शेजारचे आसन देतात. मात्र काही वेळा आधीच त्या आसनावर बसलेले पुरुष तेथून उठून मागे येण्यास अनुत्सुक असतात. अशा वेळी महिला प्रवाशांना इतर पुरुष प्रवाशांसह मागच्या आसनावर दाटीवाटीने बसून प्रवास करावा लागतो. त्यातच जुन्या फियाट गाडय़ा टॅक्सी म्हणून असताना त्यात मागील आसनव्यवस्था काहीशी मोकळी होती. त्या आसनांवर तीन प्रवासी बऱ्यापकी आरामात बसू शकत होते. मात्र सध्या असलेल्या सेंट्रो किंवा वॅगनार अशा गाडय़ांमधील मागील आसनव्यवस्था तेवढी मोकळी आणि आरामदायक नसते.
पुरुषांसह मागे बसलेल्या महिला प्रवाशांना पुरुष कधी तरी मुद्दामून खेटून बसल्याचे प्रकारही अनेकदा घडले आहेत. अशा वेळी महिला प्रवासी आणि पुरुष प्रवासी यांच्यात बाचाबाची झाल्याचे प्रकारही समोर आले आहेत. महिला प्रवाशांची ही कुचंबणा टाळण्यासाठी आता परिवहन विभागाने अनोखा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार शेअर टॅक्सींमध्ये टॅक्सीचालकाच्या शेजारील आसन महिला प्रवाशांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहे. टॅक्सीत महिला प्रवासी नसल्यास या आसनावर पुरुषांनाही प्रवास करण्यास परवानगी असेल.
या आदेशाची तातडीने अंमलबजावणी व्हावी, असे आदेश अपर परिवहन आयुक्त सतीश सहस्रबुद्धे यांनी दिले आहेत. त्याशिवाय शेअर टॅक्सींच्या मार्गावर सुरुवातीला एक फलक लावण्यात यावा, असेही सहस्रबुद्धे यांनी या आदेशात म्हटले आहे. ‘या शेअर टॅक्सी मार्गावरील टॅक्सींमध्ये वाहनचालकाच्या शेजारील आसन महिलांसाठी राखीव आहे. मात्र टॅक्सीतून महिला प्रवासी प्रवास करीत नसतील, तर त्या आसनावर पुरुष प्रवाशांना प्रवास करता येईल’, असे या फलकावर लिहिलेले असणे आवश्यक आहे. या आदेशांची तातडीने अंमलबजावणी करण्यात यावी, असेही या पत्रकात म्हटले आहे.