उरणच्या औद्योगिक प्रगतीचा महामार्ग असलेल्या उरण-पनवेल राज्य महामार्ग क्रमांक ५४ वरील जासई नाक्यावर दररोज सकाळी व संध्याकाळी होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे प्रवाशी हैराण झाले आहेत. यावर उपाय म्हणून राष्ट्रीय रस्ते विकास प्राधिकरणाने जासई नाक्यावर उड्डाण पूल तसेच रस्त्याच्या रुंदीकरणाचा नवा प्रस्ताव तयार केला असून त्यासाठी ११०० कोटी रुंपयांचा खर्च अपेक्षित आहे. या प्रस्तावाची अंमलबजावणी कधी होणार याकडे येथील प्रवाशांचे लक्ष लागून राहिले आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतुकीचा श्वास मोकळा होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. दररोज हजारो लहान, जड वाहने उरण-पनवेल मार्गावरून ये-जा करीत आहेत. दरवर्षी वाढणाऱ्या वाहनांच्या संख्येमुळे सध्याचा चार पदरी रस्ताही अपुरा पडू लागला आहे. या मार्गावरील जासई नाका येथील रस्ता अरुंद असल्याने त्याचप्रमाणे जासई नाक्यावरूनच गव्हाण कोपर परिसरात जाणारा फाटा येत असल्याने थेट जासई नाक्यावरच त्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. जड व लांब वाहनांमुळे वाहतूक कोंडी होऊन जासई नाका ते करळ दरम्यानच्या चार ते पाच किलोमीटरच्या तसेच दुसऱ्या बाजूने जासई ते गव्हाण फाटा दरम्यान वाहतूक कोंडी होऊन तीन ते चार तास अनेकांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. यावेळी अनेक वाहने विरुद्ध दिशेनेही चालविण्यात येत असल्याने अपघाताचाही धोका निर्माण झाला आहे. दररोज होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे त्रस्त झालेल्या जासईमधील नागरिकांनी वाहतूक कोंडी दूर करण्याची मागणी रस्ते विकास प्राधिकरणाकडे केली असल्याची माहिती जासई संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी दिली आहे.तर या संदर्भात पनवेल येथील राष्ट्रीय रस्ते विकास प्राधिकरणाचे प्रोजेक्ट मॅनेजर प्रशांत फेगडे यांच्याशी संपर्क साधला असता लवकर जेएनपीटीच्या विकासाचाच भाग म्हणून जासई नाक्यावर उड्डाण पूल होणार असून तसा प्रस्ताव दिल्लीच्या कार्यालयाकडे पाठविण्यात आला असून त्यांची बैठक होणे बाकी असल्याचीही माहिती त्यांनी यावेळी दिली.