जिल्ह्य़ात सद्यस्थितीत सुरू असलेल्या एकमेव सहकारी तत्वावरील कादवा साखर कारखान्याची सत्ता कायम टेवण्यात सत्ताधाऱ्यांना यश मिळाले आहे. जिल्ह्यातील इतर सर्व सहकारी कारखान्यांची अवस्था डोळ्यांसमोर असल्याने मतदारांनी ऊर्जितावस्थेत आलेल्या कादवा कारखान्याची मांड सत्ताधाऱ्यांसाठीच योग्य असल्याचे या निकालाव्दारे दाखवून दिल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
दोन वर्षांपासून लांबलेली पंचवार्षिक निवडणूक..सत्ताधाऱ्यांनी नवीन वाढीव सभासद केल्याने त्यावर विरोधकांनी घेतलेली हरकत..थकबाकीदार सभासदांना मतदानापासून वंचित ठेवण्याबाबतच्या हरकती..विद्यमान अध्यक्षांनी शेतजमीन कारखान्यातील गैरव्यवहारातूनच घेतल्याचा आरोप..अशा गोंधळात एकदाची कारखान्याची निवडणूक पार पडली. मतदारांनी सत्ताधाऱ्यांवर पुन्हा विश्वास दाखविल्याने विकास आघाडीने निर्विवाद वर्चस्व मिळविले. तर, क्रांती पॅनलला पराभव सहन करावा लागला.
प्रारंभी निवडणूक कादवा विकास आघाडीला अगदी सहज वाटत होती. परंतु क्रांती पॅनलने प्रचारात कादवाचे विद्यमान अध्यक्ष श्रीराम शेटे यांनी कोटय़वधी रुपयांचा आर्थिक घोळ करत जमीन घेतल्याचा आरोप करत त्यासंदर्भातील सातबारा उताऱ्यांचे वाटप केले. त्यामुळे निवडणूक प्रचारात रंगत आली. विरोधकांचे आरोप परतवून लावत सत्ताधाऱ्यांनी बँकेच्या कर्जाचा तपशीलच जोडल्याने विरोधकांच्या शिडातील हवा निघाली. दिंडोरी गटातून प्रविण जाधव यांनी माघार घेतल्याने कादवा विकास पॅनलचे शहाजी सोमवंशी व दिनकर जाधव हे आधीच बिनविरोध निवडून आले होते. उर्वरित १५ जागांसाठी मतदान झाले. यात मतदानाची टक्केवारी पाहता काही तरी अवचित घडेल असे वाटत होते. परंतु केवळ सोसायटी गटातील एकमेव जागेत थोडीफार चुरस पाहावयास मिळाली. ते वगळता वणी, दिंडोरी, चांदवड, वडनेर भैरव, मातेरेबाडी आणि महिला राखीव गटात कुठेच चुरस जाणवली नाही. जिल्ह्य़ातील इतर सहकारी कारखान्यांमध्ये सहकार क्षेत्रच मोडीत निघून खासगीकरणाचे वारे वाहत असताना केवळ कादवा कारखाना हाच एकमेव सहकारी तत्वावर असल्याने हा देखील मोडीत काढायचा का, असा प्रश्न सत्ताधाऱ्यांनी उपस्थित केल्याने त्यांच्या भावनिक आवाहनास सभासदांनी भरभरून साथ दिल्याचे निकालांनंतर दिसते.
कोटय़वधी रुपयांच्या तोटय़ात असलेल्या कादवाने नंतर नफ्याकडे वाटचाल केल्याने आणि उसाला अधिक भाव दिल्याने सभासदांमध्ये सत्ताधाऱ्यांविषयी विश्वास निर्माण झाला. क्रांती पॅनलचे सर्वेसर्वा अ‍ॅड. बाजीराव कावळे, सुरेश डोखळे यांनी चांदवड व दिंडोरी हे दोन तालुके कार्यक्षेत्र असलेल्या कादव्याच्या निवडणुकीत कदाचित अपयश येऊ शकेल असे जाणवत असतानाही अस्तित्व अबाधित ठेवण्यासाठी काँग्रेस, शिवसेना, भाजप, रिपाइं यासारख्या पक्षांच्या शिलेदारांच्या मदतीने क्रांती पॅनलच्या निर्मितीतून लढा दिला. त्यात काही निष्ठावंतांनी ऐनवेळेस त्यांना दगा दिल्याने कदाचित सत्ताधाऱ्यांना जास्त आघाडी मिळाली असावी. वडनेर गटातून माजी आमदार उत्तम भालेराव यांना अपेक्षित आव्हानच मिळू शकले नाही. शिरीष कोतवाल यांचे नाते उत्तम बाबांशी जुळले असल्याने त्याची मदत देखील उपयोगी ठरली.
विरोधकांनाही वडनेर गटातील संजय पाचोरकर यांचा अपवाद वगळल्यास सर्व गटांमध्ये चांगली मते मिळाली आहेत. सुरेश डोखळे यांच्या नेतृत्वाखाली होणारी ही निवडणूक तशी त्यांची पहिलीच होती.