दहा हजारांपासून ते दोन लाखांपर्यंत पोहोचलेली पाठय़वृत्ती आता तब्बल तीन लाख पस्तीस हजारांपर्यंत पोहोचली आहे. मुंबई विद्यापीठाच्या जमनालाल बजाज व्यवस्थापन शिक्षण संस्थेत (जेबीआयएमएस) नुकत्याच पार पडलेल्या निवड फेरीत काही विद्यार्थ्यांना कंपनीने तब्बल तीन लाख पस्तीस हजार रुपयांची पाठय़वृत्ती देऊ केली आहे. गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत ही पाठय़वृत्ती सर्वाधिक आहे.
तंत्रशिक्षण संस्था, व्यवस्थापन शिक्षण संस्थांमध्ये शेवटच्या वर्षांत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्टीत त्यांच्या क्षेत्रातील कंपन्यांमध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून काम करावे लागते. यामध्ये चांगली कंपनी मिळावी म्हणून विद्यार्थ्यांमध्ये चढाओढ असते. तर चांगले उमेदवार मिळावेत म्हणून कंपन्याही झटत असतात. यामुळे मुलांना जास्तीत जास्त पाठय़वृत्ती देऊन त्यांना आकर्षिक करण्याकडे कंपन्यांचा कल असतो. यातूनच विद्यार्थ्यांना अधिकाधिक पाठय़वृत्ती मिळू लागली आहे. संस्थेत यंदा पार पडलेल्या उन्हाळी सुट्टीतील प्रशिक्षणार्थी निवड प्रक्रियेत ११७ विद्यार्थी सहभागी झाले होते. या सर्व विद्यार्थ्यांची मिळून सरासरी पाठय़वृत्ती एक लाख सतरा हजारांपर्यंत पोहोचली आहे. हेच प्रमाण २०१३ मध्ये ९७ हजार, तर २०१२ मध्ये ९१ हजार इतके होते. या दोन्ही वर्षांमध्ये सर्वाधिक पाठय़वृत्ती दोन लाख रुपये देण्यात आली होती.
गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत यंदा कमी कंपन्या सहभागी झाल्या होत्या. यंदा ६५ कंपन्यांनी उन्हाळी प्रशिक्षणासाठी विद्यार्थ्यांची निवड केली, तर हेच प्रमाण २०१३ मध्ये ७१ आणि २०१२ मध्ये ८३ इतके होते. यंदा सहभागी झालेल्या कंपन्यांमध्ये काही सल्लागार कंपन्यांबरोबच सिटी बँक, एचएसबीसी, आयसीआयसीआय, जे. पी. मॉर्गन, गोदरेज, महिंद्रा, एल अ‍ॅण्ड टी अशा नामांकित कंपन्यांचाही समावेश होता. मॅकेन्झी ही कंपनी दरवर्षी वर्षअखेरीस होणाऱ्या प्लेसमेंट प्रकियेत सहभागी होते. पण यंदा प्रथमच ही कंपनी उन्हाळी नोकऱ्यांसाठीही जेबीआयएमएसमध्ये आल्याचे सर्वाधिक पाठय़वृत्ती मिळालेल्या विद्यार्थ्यांनी स्पष्ट केले. तर यंदा या निवड प्रक्रियेसाठी अनेक कंपन्या प्रथमच सहभागी झाल्या असून यात काही मोठय़ा कंपन्यांचाही समावेश झाल्याचे संस्थेने नमूद केले.