शहराचे नवीन पोलीस आयुक्त म्हणून एस.पी. यादव यांनी आज पदाची सूत्रे स्वीकारली. यादव हे अप्पर पोलीस महासंचालक दर्जाचे तेरावे पोलीस आयुक्त आहेत. यापूर्वीचे पोलीस आयुक्त के.के. पाठक यांची बदली झाल्याने हे पद रिक्त होते.
सहपोलीस आयुक्त अनुप कुमार सिंह यांनी शुक्रवारी दुपारी आयुक्त कार्यालयात पोलीस आयुक्तपदाची सूत्रे एस.पी. यादव यांना सोपवली. यादव हे १९८६ च्या आयपीएस बॅचचे अधिकारी आहेत. त्यांनी ठाणे येथून कार्याची सुरुवात केली. यानंतर त्यांनी भंडारा, परभणी, मुंबई, नांदेड आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात काम केले. नांदेडचे महानिरीक्षक, मुंबई पोलीस शहराचे आयुक्त म्हणूनही त्यांनी काम बघितले आहे. ते सध्या पुणे येथील गुन्हे अन्वेषण विभागात अप्पर पोलीस महासंचालक या पदावर कार्यरत होते.
नागपुरात गेल्या काही दिवसांत गुन्हेगारीचा आलेख वाढला आहे. खून, बलात्कार, चेन स्नॅचिंग, खंडणी मागणे, फसवणूक या घटना नित्याच्याच झाल्या आहेत. पंधरा दिवसांपूर्वी नागपुरातील मध्यवर्ती कारागृहात पाच कुख्यात गुन्हेगार पळाले. ते अद्यापही पोलिसांच्या जाळ्यात अडकले नाही. त्यामुळे पोलीस दलाची चांगलीच नाचक्की झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नागपूर हे गृहक्षेत्र आहे. अशा स्थितीत यादव या वाढत्या गुन्हेगारीवर कसा आळा घालतात, याकडे नागपूरकर जनतेचे लक्ष लागले आहे. ते एक कडक स्वभावाचे अधिकारी म्हणून ओळखले जातात. पोलीस आयुक्त पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलावे, अशी इच्छा होती. परंतु त्यांनी पत्रकारांशी बोलण्यास स्पष्टपणे नकार दिला. सध्या शहरातील गुन्हेगारीचा अभ्यास करावयाचा आहे, यानंतर मी स्वत:हून तुम्हाला बोलावेल, असे ते म्हणाले. पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर पोलीस आयुक्त पत्रकारांशी बोलतात. परंतु यादव यांनी या परंपरेला तडा दिला आहे. त्यामुळे वृत्तपत्रसृष्टीत त्यांच्याविषयी वेगळा संदेश गेला आहे. ते आपली प्रतिमा कशी निर्माण करतात आणि गुन्हेगारीवर कसा आळा घालतात, याकडे लक्ष राहणार आहे. याशिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दबावही त्यांच्यावर राहणार आहे.