सुमारे सहा दशके साहित्य आणि नाटय़क्षेत्रात विपूल लेखन करणारे ज्येष्ठ साहित्यिक प्रा.म.ना. लोही यांचे गुरुवारी पहाटे निधन झाले. ते ९२ वर्षांंचे होते. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन भाऊ, तीन बहिणी, नातवंडे आणि बराच मोठा आप्तपरिवार आहे. अंबाझरी घाटावर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
बुधवारी सायंकाळी झेरॉक्स काढण्यासाठी अभ्यंकरनगरला गेले असताना तेथून पायी परत लक्ष्मीनगरला आपल्या निवासस्थानी परत येत असताना एका अज्ञात कार चालकाने त्यांना धडक दिली. त्यात त्यांच्या डोक्याला जबर मार लागला. त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असता गुरुवारी पहाटे त्यांचे निधन झाले. साहित्य आणि नाटय़क्षेत्रातील मंडळींनी आज सकाळी त्यांच्या निवासस्थानी जाऊन दर्शन घेतले.
मधुकर नारायणराव लोही यांचा जन्म २४ मे १९२३ ला काटोलमध्ये झाला. त्यांचे पूर्व माध्यमिक शिक्षण तेथेच झाले. त्यानंतर शासकीय शाळेत शिक्षण घेतल्यानंतर शिक्षणासाठी नागपुरात आले. महालातील न्यू इंग्लिश हायस्कूल आणि त्यानंतर वसंतराव नाईक महाविद्यालयात त्यांचे शिक्षण झाले. मधल्या काळात काही वर्षे विज्ञान शाखेत बनारस हिंदू विश्वविद्यालयात ते होते. दै. महाराष्ट्रमध्ये सहसंपादक म्हणून त्यांनी काम केले. त्यानंतर काही महिने वाशिमच्या राजस्थान आर्य महाविद्यालयात ते प्राध्यापक होते. १९६० मध्ये हिस्लॉप महाविद्यालयात त्यांनी अध्यापन केले. त्यानंतर १९८३ मध्ये ते धनवटे नॅशनल महाविद्यातून सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी जास्तीत जास्त वेळ लेखनात घालविला. निवडक व्यक्तीरेखा, साहित्य आणि कला, निबंधसंचय, लाटांचा आवाज, शरद्चंद्र- एक अभ्यास, माझ्या सत्याचा शोध, राम गणेश गडकरी, देवी अहिल्याबाई होळकर, कृषिकेंद्रित वैदिक धर्म आणि संस्कृती, मराठी नाटक आणि रंगभूमी, मला घडलेले भारत, नाटक आणि रंगभूमी ही त्यांची साहित्यसंपदा आहे. या व्यतिरिक्त वर्तमानपत्र, नियतकालिके, दिवाळी अंकांमध्ये त्यांनी विविध विषयांवर लेखन केले. आकाशवाणीवर त्यांची बरीच व्याख्याने झाली. त्यावर श्रुतिकाही प्रसारित झाल्या होत्या. स्फुटलेखन त्यांनी केले आहे.