शहरातील पाणी गळती थांबविण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना करण्यासाठी महापालिकेने पाणीपुरवठय़ाचे परीक्षण करण्याची मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे.
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर तसेच दारणा धरणातून दररोज सुमारे ४०० दशलक्ष लिटर पाण्याचा उपसा केला जातो.
ऋतुमानानुसार पाण्याच्या मागणीत बदलही केला जातो. उपसा झालेले पाणी शहरातील पाच जलशुद्धीकरण केंद्र, ७८ जलकुंभ आणि सुमारे एक हजार किलोमीटर लांबीच्या जलवाहिनीद्वारे वितरित केले जाते. परंतु पाणीपुरवठा करताना अनेक ठिकाणी पाण्याची गळती होते. तसेच वितरित झालेल्या पाण्याचा हिशेब, बाह्य़ वापर सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी व पर्यावरण संघटनेच्या मार्गदर्शन तत्त्वानुसार नमूद प्रमाणापेक्षा अधिक असल्याचे स्पष्ट होते.
शहरात सुमारे दोन लाख नळजोडणी असताना जेवढा पाणी पुरवठा होतो, त्याच्या ५० टक्केही देयके वसूल होत नसल्याचे शिवसेनेने निवेदनाद्वारे महापालिका आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले आहे.
शहरात होणारा एकूण पाणीपुरवठा, पाण्याची गळती व हिशेब तसेच बाह्य़ वापराचा शोध घेण्यासाठी पाणी पुरवठय़ाचे परीक्षण करणे गरजेचे आहे.
शहरात होणारी पाण्याची गळती आणि बेकायदेशीर नळजोडणी या विषयावर आपल्या भावना तीव्र असून लवकरात लवकर पाणी परीक्षण करून पालिकेचे नुकसान टाळावे, असे आवाहन अभय दिघे, पृथ्वीराज अंडे, संतोष आखाडे, श्रीनिवास मोरे आदींनी केले आहे.