‘क्राईम पेट्रोल दस्तक’ या सोनी टीव्हीवरील कार्यक्रमामध्ये दिल्ली सामूहिक बलात्काराच्या घटनेचे रूपांतरित चित्रीकरण शनिवार आणि रविवारच्या भागांमध्ये दाखविण्यात येणार आहे. निर्भयाच्या मृत्यूनंतर या प्रकरणातील नराधमांना शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर हा विशेष भाग दाखविण्यात येणार असून काही गोष्टी प्रतिकात्मक दाखविल्या जाणार आहेत.
शनिवार-रविवारच्या भागांमध्ये दिल्लीच्या दुर्दैवी घटनेचे नाटय़ रूपांतर केलेले चित्रण दाखविण्यात येणार असले तरी मुळात पुरुषांचा महिलांप्रती असलेला दृष्टिकोन मुळापासून बदलण्याची गरज आहे. त्यासाठी प्रत्येकाने आपल्या घरापासून, कुटुंबापासून सुरुवात करायला हवी. आपल्याच घरात महिलांना कसे वागविले जाते ते लहान मुले पाहत असतील तर त्याचप्रमाणे मोठे झाल्यावरही मुले आपल्या बायकोला वा अन्य महिलांना तशाच प्रकारची हीन वागणूक देऊ लागतात हा सर्वसाधारण अनुभव सर्वानाच आहे. म्हणून घरातील पुरुष सदस्यांवर लहानपणापासून महिलांचा आदर करण्याचा संस्कार मनावर ठसविला पाहिजे, असे ‘क्राईम पेट्रोल  दस्तक’चा निवेदक- सूत्रसंचालक अनुप सोनी म्हणाला.
या घटनेने समाज हादरला, लोकांनी रस्त्यावर उतरून गुन्हेगारांना त्वरीत पकडून कडक शिक्षेची मागणी केली. त्यामुळे सरकारवर आणि न्याययंत्रणेवरही दबाव आला. त्यामुळेच खटल्याचा निकालही त्वरित लागला. मात्र अशा प्रत्येक घटनेबाबत समाज तेवढय़ाच तीव्र पद्धतीने प्रतिक्रिया व्यक्त करीत नाही. त्यामुळेच गुन्हेगारी का वाढतेय, महिलांवरील अत्याचार का वाढताहेत, लोकांची विचार करण्याची पद्धत कशी आहे, ते विचार बदलायचे असतील तर काय करायला पाहिजे यासारखे प्रश्न आपण ‘क्राईम पेट्रोल दस्तक’च्या माध्यमातून उपस्थित करणार असल्याचे अनुप सोनी म्हणाला.