आंतरराष्ट्रीय कथ्थक नृत्यांगना, महाविद्यालयाचा अभिनेता, वादविवाद स्पर्धेची विजेती पट्टीची वक्ता, तायक्वांडो, कुस्ती, मल्लखांब, नेमबाज, किक्बॉक्सिंगचे राष्ट्रीय खेळाडू, एनएसएस, एनसीसीचे पदक विजेते विद्यार्थी-विद्यार्थिनी.. गेल्या वर्षभरामध्ये ठाण्यातील विविध महाविद्यालयांमध्ये ‘महाविद्यालयाचे स्टार’ असे बिरुद मिरवणाऱ्या महाविद्यालयीन तरुणांनी ‘लोकसत्ता ठाणे’च्या ‘कट्टा गोलमेज’वर हजेरी लावली होती. कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयामध्ये भरलेल्या या कट्टा गोलमेजमध्ये या तरुण मंडळींनी आपल्या यशाची सूत्रे उपस्थितांसमोर मांडली. वेगळं क्षेत्र निवडताना आलेले अनुभव, प्राध्यापक-घरच्या मंडळींचे सहकार्य आणि यश मिळाल्यानंतर मिळणारा सन्मान सगळ्याचे विस्तृत विवेचन या तरुणांनी केले. महाविद्यालयाच्या वर्षभरामध्ये ‘आम्ही बि घडलो, तुम्ही बि घडाना’ असा संदेश त्यांनी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना या माध्यमातून दिला.

महाविद्यालयात प्रवेश केल्यानंतर वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये तुमचा प्रवास सुरू झाला. या प्रवासात यश मिळाल्यानंतर तुमच्या आयुष्यात कसे बदल होत गेले? महाविद्यालयाचे सेलिब्रिटी झाल्याचा अनुभव कसा होता? प्राध्यापक, मित्रमंडळी आणि घरच्या मंडळींचा प्रतिसाद कसा होता?

अरुंधती देशपांडे :
मित्रांचे सहकार्य विचाराल तर त्यांच्यामुळेच मी उत्तीर्ण झाले आहे, असे म्हणावयास हरकत नाही. मी नापास होऊ नये, मागे राहू नये म्हणून त्यांनीच माझा पूर्ण अभ्यास घेतला आणि वारंवार एक सल्ला दिला.. ‘तू फक्त अभ्यासावर लक्ष देऊ नको, खेळावर लक्ष केंद्रित कर, तुझा खेळच तुला एक नवी ओळख देईल.’

संदेश पडवळ :   बक्षीस मिळाल्यावर, ‘सेलिब्रेटी’ झाल्याची भावना सर्वात आधी महाविद्यालयामध्ये अनुभवयाचा योग येतो. अभिनय क्षेत्रात असल्याने सर्व मित्र ‘काय रे आता तू मोठा दिग्दर्शक होणार’ अशी काही वाक्यं बोलायचे. त्याचे मला फार कौतुक वाटायचे. नोटीस बोर्डवर लागलेल्या पत्रकाची चर्चा संपूर्ण महाविद्यालयामध्ये गाजते, तो क्षण खरंच अविस्मरणीय असतो.

प्रणव आगाशे :  बक्षीस मिळण्याचा आनंद विद्यार्थ्यांपेक्षा शिक्षकांना सर्वाधिक होतो. उत्साहात आणि जल्लोषात महाविद्यालयामध्ये स्वागत होते. मित्र मंडळी आणि शिक्षकवर्ग कौतुकाने शुभेच्छा देत असतात. आपल्या यशाचा आनंद दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर पाहण्याचा योग फक्त आणि फक्त महाविद्यालयामध्येच येऊ शकतो.

कांचन सकुंडे :
स्पर्धा जिंकून आल्यावर महाविद्यालयात ओळख होते. आता महाविद्यालयात प्राध्यापक महाविद्यालयाची मेरी कोम म्हणून संबोधतात. मित्र-मैत्रिणी बॉक्सर वगैरे हाक मारतात. त्यामुळे अजून प्रोत्साहन मिळते.

अंजली सुरांजे :
बक्षीस हे वैयक्तिकरीत्या मिळाले तरीही आनंद हा सामूहिक असतो. शिक्षक, मित्र-मंडळी, प्रशिक्षक यांना आपल्याला मिळालेल्या यशाचा आनंद सर्वाधिक असतो. तो पाहून आणखी मेहनत करण्याची ऊर्जा मिळते. आपण स्वत:साठी नाही तर आपल्या महाविद्यालयासाठी स्पर्धेमध्ये भाग घेतो, त्यामुळे मिळालेलं यश हे एकटय़ाचं नसून सर्वाचं असतं. त्यामुळे महाविद्यालयातील वातावरण आनंदी पाहून अधिक आनंद होतो.

भाग्यश्री भोईर :  ऑल इंडिया डी. जे. एनसीसीचा पुरस्कार मला जाहीर झाला, तेव्हा अनेक मित्र-मैत्रिणींचे दूरध्वनी आले, परंतु त्यावर माझा विश्वासच बसत नव्हता. परंतु जेव्हा वर्तमानपत्रात बातमी वाचली तेव्हा विश्वास पटला. महाविद्यालयाच्या सहकार्याने आपल्याला अशा स्पर्धामध्ये भाग घेण्याची संधी मिळते. बक्षिसे मिळवून आपण आपल्या महाविद्यालयाचे, राज्याचे, देशाचे जेव्हा नाव मोठे करतो, त्याचा खरा आनंद आपल्या शिक्षाकांना आणि मित्र-मैत्रिणींना अधिक होत असतो.

पल्लवी लेले :   स्पर्धा मी जिंकल्या असल्या तरी माझ्यापेक्षा जास्त आनंद माझ्या मित्र-मैत्रिणींना होतो. घरी आल्यावर माझी सही वगैरे घेतली, महाविद्यालयात कायम आनंद व्यक्त केला जातो. हे सगळ्यांचे प्रेम आहे. आशीर्वाद आहेत, असे समजते. नृत्यामध्ये माझे कौशल्य पाहून महाविद्यालयाने पहिल्यांदाच नृत्यामध्ये प्रावीण्य मिळवलेल्या मुलांना बक्षीस देण्याची नवी संकल्पना सुरू केली ही आनंदाची गोष्ट होती.

रियांका मिश्रा :   हिंदुस्थानी प्रचारसभेचे चर्चासत्र होते. त्यामध्ये वाणिज्य महाविद्यालयाची विद्यार्थिनी म्हणून भाग घेणारी मी पहिलीच होते. शुद्ध हिंदूी भाषेत मी बोलून मी पहिला क्रमांक पटकाविला ही माझ्या आयुष्यातली खूप मोठी गोष्ट होती. तेथून आल्यावर कला शाखेच्या आमच्या उपप्राचार्यानी आम्हाला विचारले, ‘तू कोठून आलीस?’ मी वाणिज्य महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे हे समजल्यावर त्यांनी सांगितले, ‘कला विभागात आली असती तर अजून विकसित झाली असतीस.’ कला शाखेच्या विद्यार्थ्यांनी ते पारितोषिक जिंकणे हा जो पायंडा होता, तो मी मोडला होता. महाविद्यालयात माझ्या नावाची चर्चा होती. माझ्या शिक्षिकेने तर मला उचलून घेत मिठी मारली तेव्हा मला तर आकाशही ठेंगणे वाटू लागले. हा सगळा अनुभव खूप काही शिकवून गेला.

अंकित अगरवाल
मित्र तर माझा एक परिवारच आहे. विविध स्पर्धामध्ये भाग घेतल्यामुळे आणि टॉपर्स केल्यामुळे मला एक वेगळी ओळख मिळाली होती. त्यात भर पडली मिस्टर बिर्ला किताबाची, हा किताब पटकाविल्यामुळे मला एक वेगळाच आत्मविश्वास मिळाला. आपण जीवनात काहीतरी वेगळे केले आहे, काहीतरी नाव कमावले आहे याची जाणीव त्या पुरस्काराकडे पाहिली की नेहमी होते.

कांचन सकुंडे :
स्पर्धा जिंकून आल्यावर महाविद्यालयात ओळख होते. आता महाविद्यालयात प्राध्यापक महाविद्यालयाची मेरी कोम म्हणून संबोधतात. मित्र-मैत्रिणी बॉक्सर वगैरे हाक मारतात. त्यामुळे अजून प्रोत्साहन मिळते.